पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या ‘क्लस्टर एस्.टी.पी.’ प्रकल्पाविषयी समन्वयाने नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण, नागरी प्रश्नांचा बैठकीत आढावा
मुंबई – नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा, तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. पंचगंगा नदीकाठच्या १६१ गावांच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी ‘क्लस्टर एस्.टी.पी.’ पद्धतीने आराखडे सिद्ध करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हातकणंगले मतदारसंघातील ग्रामीण आणि नागरी प्रश्नांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या प्रसंगी हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांसह अन्य उपस्थित होते.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. विशेषतः गडदुर्गांच्या अनुषंगाने एक आराखडा सिद्ध करता येईल. सातारा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे.’’