पिंपरी (पुणे) शहरामध्ये गत ५ वर्षांत गोहत्येच्या ६४ गुन्ह्यांची नोंद !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गेल्या ५ वर्षांमध्ये गायींची चोरी, हत्या आणि गोवंश मांस विक्री या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या संदर्भातील ६४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. शहरामध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील तरतुदींची प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांनी अन्वेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाणही अल्प आहे. (गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करत आहेत, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोहत्या रोखण्यासाठी नक्कीच साहाय्य होईल ! – संकलक)
पहाटे-रात्रीच्या वेळी समाजविघातक टोळ्या सक्रीय होऊन महापालिका क्षेत्रातील व्यक्तीगत गोठा आणि रस्त्यावरील मोकाट पशूधन यांना ‘भुली’चे इंजेक्शन देऊन त्यांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करतात, तसेच गोवंशियांची हत्या करून मांसविक्रीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. चाकण पोलीस ठाणे आणि तळेगाव पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये प्रत्येकी १३ गुन्हे, भोसरी पोलीस ठाण्यात ११ गुन्हे, तर देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये १० गुन्ह्यांच्या नोंदी आहेत.
मानद पशूकल्याण अधिकारी नीलेश चासकर म्हणाले की, महापालिका, पशूवैद्यकीय विभाग, आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना कारवाईसाठी पाठपुरावा केला जातो; परंतु कारवाई होत नाही. गायींची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना केवळ २ दिवसांमध्ये ‘पॅरोल’वर (विशिष्ट मुदतीसाठी सशर्त मुक्तता) सोडले जाते. त्यामुळे गोहत्यांमध्ये वाढ होत आहे. (यावरून पोलिसही कसायांना सामील आहेत का ? असा प्रश्न कुणाच्याही मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकागोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे, हे लज्जास्पद आहे ! देशात होणारी गोहत्या आणि त्यावर शासनाचे निर्बंध नसणे, हे सध्याचे धगधगते सूत्र आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच गोहत्या थांबत नाहीत, हे गंभीर आहे. पोलिसांनी स्वतःहून पाळत ठेवून कसायांना पकडणे यांसह मूळ सूत्रधारांवरच पोलिसांनी कडक कारवाई करावी ! |