चीनने गलवान खोर्यातून सैन्यकपात केलेली नाही ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे
नवी देहली – लडाखमधील गलवान खोर्यात ३० मासांपूर्वी भारत आणि चीन यांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतरही चीनने तेथील सैनिकांच्या संख्येत कपात केलेली नाही किंवा तेथे सैन्यासाठी उभारण्यात येणार्या प्राथमिक सुविधांमध्येही काही कपात केलेली नाही. त्यामुळे येथील स्थिती सध्या स्थिर दिसत असली, तरी त्यावरून कोणतेही अनुमान काढता येणार नाही, अशी माहिती भारतीय सैन्यदलाचे प्रमुख मनोज पांडे यांनी दिली. ते ‘चाणक्य डायलॉग्ज’ या कार्यक्रमात बोलत होते. गेल्या अडीच वर्षांपासून भारत आणि चीन यांनी येथे प्रत्येकी ५० सहस्र सैनिक, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा केला आहे.
जनरल मनोज पांडे पुढे म्हणाले की,
१. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, चीन सांगतो एक आणि करतो दुसरेच. एक प्रकारे हा धोकाच आहे. आपल्याला त्याच्या लेखी विधानांवर किंवा संहितेवर नाही, तर त्याच्या प्रत्यक्ष कृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२. गलवान भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थंडीच्या काळात चीनच्या सैनिकांची संख्या अल्प होण्याची शक्यता आहे. तरीही व्यापक दृष्टीने येथे आपल्याला सावधान राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भारत स्वतःचे रक्षण करू शकेल.
३. भारत आणि चीन यांच्यातील वादाविषयी पुढच्या टप्प्याच्या सैन्यवार्तेमध्ये २ सूत्रे सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे. आतापर्यंत ७ पैकी ५ सूत्रांवर तोडगा काढण्यात आला आहे. तथापि डोमचोक आणि देपसांग येथील सूत्रे अद्याप शेष आहेत.
संपादकीय भूमिकाभारताच्या मुळावर उठलेल्या धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल, अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे ! |