उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कोलशेत (जिल्हा ठाणे) येथील कु. राधिका पाटील (वय १७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. राधिका पाटील या पिढीतील आहेत !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
१. निरागस आणि शांत
‘राधिका लहानपणापासूनच निरागस आणि शांत आहे. ‘तिच्याकडे पाहून तिचा नामजप चालू आहे’, असे जाणवते. तिला कधी राग येत नाही किंवा तिच्यात अहं जाणवत नाही.’ – सौ. सारिका माने (मावशी) आणि कु. विश्वजा माने (मावस बहीण), ठाणे
२. मनमोकळेपणा
‘राधिका पूर्वी पुष्कळ शांत आणि अबोल होती; पण आता ती मोकळेपणाने बोलते. ती अधिक काळ साधना आणि नामजप या विचारांतच असते. ती मनाने पुष्कळ धीट झाली असून पूर्वीपेक्षा अधिक आनंदी दिसते.’ – कु. रंजना शिंदे (मावशी), पनवेल
३. इतरांना साहाय्य करणे
‘मी सेवा करून घरी येईपर्यंत घरातील केर काढणे, पाणी भरणे, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे आणि घराची दृष्ट काढणे इत्यादी कामे ती न सांगता करते.
४. सेवेची आवड असणे
तिला काम सांगितले की, ती लगेच स्वीकारते. सुट्टीच्या दिवशी ती दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, वाचकांना सनातनची सात्त्विक उत्पादने पोचवणे, अशा प्रकारच्या सेवा करते.
५. साधनेत स्वावलंबी होणे
अ. पूर्वी ती पुष्कळ हळवी आणि घाबरट होती. आता ती आध्यात्मिक त्रास होत असतांना प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधते आणि त्रासावर मात करते. ती आता पहिल्यापेक्षा सक्षम आणि स्वावलंबी झाली आहे. ती अंतर्मुख झाल्यासारखी वाटते.
आ. तिच्या मनाविरुद्ध घडलेला प्रसंग, शाळेत किंवा नातेवाईक यांच्यामुळे घडलेला प्रसंग ती परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करतांना सांगते आणि त्यावर मात करून आनंदी असते.
इ. ‘स्वयंसूचना कशा करायच्या ?’, हे शिकून ती प्रसंगानुसार स्वयंसूचना स्वतःच तयार करून घेते.
६. साधनेला प्राधान्य देणे
तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले आहेत. ‘नामजप २ घंटे पूर्ण करणे, सतत अनुसंधानात रहाणे, प्रार्थना आणि कृतज्ञता कशा वाढतील, त्यासाठी प्रयत्न करणे अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सूचनांचे पालन करणे’, या कृती ती दिवसभर करत असते. या वर्षी ती इयत्ता दहावीत आहे; पण ती साधनेलाच प्राधान्य देते. ती प्रथमोपचारवर्गाला जाते आणि अधून-मधून सत्संगाला येते.’ – सौ. कविता पाटील (आई)
७. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव
‘राधिकामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आणि प्रेम दिसून येते. त्यांच्याविषयी बोलतांना तिचा भाव जागृत होतो. राधिकाकडे बघून ‘तिच्या समवेत परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असे वाटते.’ – सौ. सारिका माने (मावशी) आणि कु. विश्वजा माने (मावस बहीण), ठाणे
८. सर्व श्रेय देवाला देणे
‘शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका सांगतात, ‘‘राधा नेहमी हसतच असते. ती काही वेगळीच आहे. ‘आम्हाला तिच्यासारखी मुलगी असावी’, असे वाटते. तिचे कितीही कौतुक केले, तरी ती भारावून न जाता नुसती हसत रहाते आणि सर्व श्रेय परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीकृष्ण यांना देते.’’
९. रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर साधनेचा निश्चय करणे
एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तिथे संतांचा सत्संग लाभला. तेव्हापासून राधिका पुष्कळ आनंदी असते. तिचे दूरचित्रवाणी बघणे पूर्णपणे बंद झाले आहे. ती सतत परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण काढत असते. ‘त्यांच्याविषयी किती बोलू अन् किती नको’, असे तिला वाटते. तिला आता बाह्य गोष्टींत रस उरलेला नाही. ‘मी प्रत्यक्ष भगवान विष्णूला भेटले’, या विचाराने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिला ‘आपत्काळ आहे, तर साधनाच करावी’, असे वाटते.
– सौ. कविता पाटील (राधिकाची आई), कोलशेत, ठाणे. (जून २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |