हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
|
वाराणसी (उत्तरप्रदेश), १२ नोव्हेंबर (वार्ता.) – कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर ‘घर विकणे आहे’, असा फलक लावल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.
भारत आणि नेपाळ यांना राज्यघटनेच्या दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्र बनवण्याची योजना आखण्यासाठी १२ नोव्हेंबरला वाराणसीच्या आशापूर येथील ‘तनिष्क बँक्वेट हॉल’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित २ दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यात सद्गुरु डॉ. पिंगळे बोलत होते. या अधिवेशनाचा प्रारंभ उपस्थित संतांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी ब्रह्मयानंद आणि योगीराज पीठाधीश्वर राजकुमार महाराज यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानवापी प्रकरणात श्री शृंगार गौरी देवीच्या पूजेची अनुमती मिळावी, यासाठी कायदेशीर लढा देणारे डॉ. सोहनलाल आर्य, डॉ. रामप्रसाद सिंह आणि अधिवक्ता मदन मोहन यादव यांचा या अधिवेशनात सन्मान करण्यात आला. यासह ‘सनातन पंचांग २०२३’च्या हिंदी ‘ॲन्ड्रॉइड ॲप’चे प्रकाशनही व्यासाचार्य किशोर गौतम यांच्या हस्ते करण्यात आले.
१. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले की, देहली, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा इत्यादी राज्यांतील १०० हून अधिक संघटना, तसेच नेपाळ आणि अमेरिका येथील हिंदूंनी ज्ञानवापीच्या मुक्तीसाठीच्या कायदेशीर लढ्याला पाठिंबा दिला आहे.
२. या प्रसंगी नेपाळचे व्यासाचार्य किशोर गौतम म्हणाले, ‘आजच्या स्थितीत पृथ्वीवर एकही हिंदु राष्ट्र नाही. नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार झपाट्याने होत आहे. आगामी काळात नेपाळ हे मिझोराम, अरुणाचल प्रदेश यांप्रमाणे ख्रिस्ती राज्य बनेल. हे षड्यंत्र रोखण्यासाठी भारत आणि नेपाळ यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.