कीर्तने आणि प्रवचने यांतून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांची सद्य:स्थिती सांगून जनप्रबोधन करा !

महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत सहस्रो कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तसेच व्याख्याते सण-उत्सव, कीर्तन सप्ताह, राष्ट्रीयदिन, क्रांतीकारक जयंती किंवा पुण्यतिथी आदींच्या निमित्ताने विविध विषय मांडून समाजाचे प्रबोधन करतात. अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांतून समाजाचे प्रबोधन करणे, ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. राष्ट्र, धर्म, संस्कृती, अध्यात्म आदींचे महत्त्व समाजाच्या मनावर बिंबवण्यात, तसेच राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी मार्गदर्शन करण्यात या परंपरेचा मोलाचा वाटा आहे.


प्रतिकात्मक छायाचित्र

१. सद्य:स्थितीत कीर्तनकारांनी कीर्तनांतून राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता !

कीर्तनकार स्वत:च्या विशिष्ट शैलीत विषय मांडत असल्याने त्यांच्या बोलण्याचा समाजमनावर तात्काळ प्रभाव पडतो. काही कीर्तनकार, प्रवचनकार आणि कथाकार धार्मिक कार्यक्रमांतून देश, देव अन् धर्म यांची सद्य:स्थिती अन् त्यांवरील आघात यांविषयी प्रबोधन करतात. त्यांनी मांडलेला विषय ऐकल्यावर श्रोतृवर्गातून ‘ही काळाची निकड आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटते.

राष्ट्र आणि धर्म यांप्रती जागरूक असलेल्या अनेक कीर्तनकारांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून ‘आम्हाला राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विषय मिळाल्यास आम्ही ते कीर्तनांत मांडू’, असे सांगितले आहे. त्या कीर्तनकारांना समितीद्वारे असे विषय नियमितपणे पाठवले जातात. आपणांपैकी जे कीर्तनकार राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात किंवा या संदर्भातील ताज्या घडामोडींचे विषय मांडून जन-प्रबोधन करण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी त्यांचा ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक आम्हाला कळवावा. त्यांनाही असे विषय ‘व्हॉट्सॲप’द्वारे पाठवण्याचे नियोजन केले जाईल. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही संकल्पना केवळ थोड्याच कीर्तनकारांपुरती मर्यादित न रहाता ती सर्वत्रच्या कीर्तनकारांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अशा प्रकारे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रबोधन करण्यास इच्छुक असणार्‍या परिचयातील कीर्तनकारांचे नाव आणि ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक आम्हाला कळवल्यास ही माहिती त्यांनाही पाठवता येईल.

२. कीर्तनकारांनी कीर्तनांतून राष्ट्र आणि धर्म जागृतीपर विषय मांडल्यास सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत विषय पोचून त्यांच्यात जागृती निर्माण होईल !

सध्या बर्‍याच ठिकाणी कीर्तने, प्रवचने आदींचे आयोजन केले जाते. या वेळी कीर्तनकार त्यांच्या कीर्तनांतून धर्मरक्षण परंपरा, पुरागोमी अन् नास्तिक यांच्याकडून या परंपरांना होणारा अनाठायी विरोध, धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे सरकारीकरण, देवतांची होणारी विटंबना आणि संतांची केली जाणारी अपकीर्ती, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आदी विषय मांडू शकतात. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत वेगवेगळे विषय पोचून त्यांच्यात जागृती निर्माण होईल आणि या कार्यात कीर्तनकारांचेही योगदान राहील.

कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तसेच व्याख्याते यांना कीर्तनात मांडण्यासाठी वरील विषयांची विस्तृत माहिती हवी असल्यास समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी किंवा श्री. अरुण कुलकर्णी यांना ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा वा hindujagruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.