गड-दुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – गड-दुर्गांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य आणि दैदीप्यमान इतिहास कायम राहिला पाहिजे. त्यासाठी ज्या गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती सरकारने तात्काळ हटवावीत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली.
‘लव्ह जिहाद’ प्रकरणात हिंदु युवतींना फसवले जात असल्याने भाजप आवाज उठवेल !
राज्यात ९९.९९ टक्के प्रकरणांमध्ये हिंदु युवतींना जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्धपणे जाळ्यात ओढून त्यांना फसवले जात असल्याचे प्रकार उघड होत आहेत. यासाठी हिंदु युवतींना आमीषही दाखवले जाते. त्याला अनुसरून अनेक प्रकरणांत भ्रमणभाषवरील संभाषण उपलब्ध आहे, तसेच पोलिसांचा अहवालही तसाच आहे. हे प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याने त्याला आळा बसला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात हिंदु युवतींना फसवले जात असल्याने भाजप त्या संदर्भात आवाज उठवेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक योग्यच !
जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. त्यांनी अनंत करमुसे या कार्यकर्त्याला सरकारी बंगल्यात आणून मारहाण केली होती. त्या संदर्भात तत्कालीन सरकारने आव्हाड यांच्या विरोधात काहीही कारवाई केली नाही. करमुसे यांना न्याय मिळवण्यासाठी शेवटी न्यायालयात जावे लागले. ठाणे येथील प्रकरणात पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्यानेच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. कोणत्याही चित्रपटात एखादी गोष्टी आक्षेपार्ह वाटत असेल, तर त्याला विरोध करण्याचे अनेक मार्ग लोकशाही पद्धतीत उपलब्ध आहेत. ते परिनिरीक्षण मंडळाला पत्र लिहू शकतात, निदर्शने करू शकतात, उपोषण करू शकतात; मात्र प्रेक्षकांना मारहाण करणे, हा काय प्रकार आहे ?
समान नागरी कायदा असावा, ही भाजपची ३० वर्षांपासूनची मागणी !गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा करणार का ? असा प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने विचारल्यावर बावनकुळे यांनी, ‘समान नागरी कायदा असावा अशी भारतीय जनता पक्षाची गेल्या ३० वर्षांपासूनची मागणी आहे’, असे उत्तर दिले. |
चाकण (पुणे) येथील संग्रामदुर्ग गडावरील अतिक्रमण हटवले !
पुणे – येथील चाकण जवळील संग्रामदुर्ग गडावरील अनधिकृत बांधकाम पुरातत्व विभागाने चाकण नगरपरिषद आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्या सहकार्याने ९ नोव्हेंबर या दिवशी हटवण्यात आले. या गडावर पत्र्याची शेड टाकण्यात आली होती. ही पत्र्याची शेड आणि या परिसरात असलेले अतिक्रमण हटवावे, अशी मागणी ‘फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान’च्या वतीने पुरातत्व विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.