वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच
१. रहात्या इमारतीतील एक व्यक्ती ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाल्याने सासरी जावे लागणे, तिथे असलेल्या असुविधांमुळे फार दिवस तिथे राहू शकणार नसणे; मात्र तिथे जमतील तसे साधनेचे प्रयत्न करणे
‘वर्ष २०२० च्या जुलै मासाच्या आरंभी आमच्या रहात्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर एका भागात रहाणार्या व्यक्तीचे ती ‘कोरोना पॉझिटीव्ह’ असल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही रहात असलेली इमारत सील करण्यात आली. त्यामुळे मला माझ्या दोन लहान मुलींना (मोठीचे वय ४ वर्षे आणि धाकटीचे वय ३ वर्षे) घेऊन माझ्या सासरी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिथे मी २ जुलैपासून जाऊन राहिले आणि जमतील तसे साधनेचे प्रयत्न करत होते. आम्ही संगारेड्डीला परत जाण्याच्या प्रतीक्षेत होतो. १२ जुलै या दिवशी घराशेजारी असलेल्या त्या रुग्णाचा ‘कोरोना’ चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ यायची वाट बघत आम्ही गावी एक एक दिवस ढकलत होतो; कारण सासरी असलेल्या असुविधांमुळे तिथे आम्ही फार दिवस राहू शकणार नव्हतो.
२. भगवंताला शरण जाण्याचे प्रयत्न आतून होत असल्यामुळे घडणार्या प्रसंगांत स्थिर रहाता येणे
वरील प्रसंगी परिस्थितीशी जुळवून घेणे, सर्व प्रसंगी आपली साधनेची तळमळ ठेवून प्रयत्न करणे, परिस्थिती स्वीकारून तीच आम्हाला क्षणोक्षणी सुरक्षित ठेवत आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यासाठी भगवंताला शरण जाणे, इत्यादी प्रयत्न आतून होत होते. ते प्रयत्न होत असल्यामुळे आम्हाला घडणार्या प्रसंगांत स्थिर रहाता आले.
३. सासूबाईंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्याजवळ बसून रहावे लागणे आणि त्या वेळी भीती न वाटता नामजप चालू असून स्वत:भोवती संरक्षककवच असल्याचे जाणवणे
९ जुलै या दिवशी अकस्मात् माझ्या सासूबाईंचे निधन झाले. ‘ते कोणत्या कारणाने झाले ?’, त्याचे निदान होऊ शकले नाही; पण त्या धक्कादायक प्रसंगी जे घडत होते, ते सर्व बुद्धीअगम्य होते. ते घडत असतांना आलेल्या अनुभवांतून आम्हाला गुरुकृपा अनुभवता आली. माझ्या सासूबाईंचा ज्या वेळी मृत्यू झाला, तेव्हा त्यांना कुठलाही त्रास न होता झोपेत असतांना त्यांचे प्राण गेले. त्या वेळी घरातील स्त्री सदस्य म्हणून मला त्यांच्याजवळ बसून रहावे लागले. त्या वेळी देवाने मला कसलीही भीती वाटू दिली नाही. त्या वेळी नामजप चालू होता आणि माझ्याभोवती मला एक संरक्षककवच असल्याचे जाणवत होते. ‘जे घडत होते, त्यात गुरुदेव मला स्थिर ठेवत होते’, असे मला स्पष्टपणे जाणवत होते. साधारण सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मला त्यांच्याजवळ बसून रहावे लागले.
४. पुढे त्यांना स्नान घालणे, त्यांच्या मागे अंत्ययात्रेसोबत जप करत जाणे आणि अग्नीसंस्कार बघणे, हे सर्व मला करावे लागले; पण ‘त्याचा कसलाही त्रास न होता किंवा भीती न वाटता तिथे स्वतःला स्थिर रहाता आले’, ही केवळ गुरुकृपाच आहे.
५. धाकट्या मुलीला ‘युरीन इन्फेक्शन’ झाल्याने तिला उपचारांसाठी ‘ऑटो रिक्शा’मधून ११४ कि.मी. दूर न्यावे लागणे, ३ घंट्यांच्या त्या प्रवासात देवाचा अखंड धावा चालू असणे आणि त्या वेळी मन स्थिर असल्याचे अनुभवता येणे
१० ते २० जुलै या कालावधीमध्ये माझी धाकटी मुलगी मानसी (वय ३ वर्षे) हिला ‘युरीन इन्फेक्शन’ झाले. प्रारंभी तिने सलग ८ वेळा उलटी केली. त्यामुळे तिला आधुनिक वैद्यांकडे नेले होते. त्यांनी तिला औषधे दिली; पण ती लागू न झाल्याने तिला जेवण किंवा पाणी पचत नव्हते. तिची प्रकृती खालावत होती. आम्ही गावी असल्यामुळे माझ्या यजमानांना तेथून हलता येत नव्हते. त्या वेळी मी दोन्ही मुलींना घेऊन सासरहून संगारेड्डीला उपचारांसाठी जायचे ठरले. तिथे जायला अन्य माध्यम नसल्यामुळे ‘ऑटो रिक्शा’मधून जायचे ठरवले. तेव्हा ‘प्रवास करतांना एकटीने कसे जमेल ?’, असे न वाटता तो ११४ कि.मी.चा प्रवास दोन लहान मुलींना घेऊन केला. ३ घंटे ‘ऑटो’ने प्रवास झाला; पण त्यात बसल्यापासून उतरेपर्यंत मी देवाचा धावा अखंड करत होते आणि त्या वेळी माझे मन स्थिर असल्याचे मला अनुभवता आले.
६. संगारेड्डीला ‘फॅमिली डॉक्टर’ असल्यामुळे त्यांचे उपचार लागू पडणे आणि अल्प कालावधीमध्ये मुलीला बरे वाटू लागणे
रात्री ८.३० ला आम्ही संगारेड्डीला पोचलो. मी मुलीला थेट रुग्णालयात नेले. तिथे आमचे ‘फॅमिली डॉक्टर’ लगेच भेटले. मुलीला भरती (ॲडमिट) करण्याऐवजी त्यांनी तिला प्रतिदिन रुग्णालयात नेऊन सलाईन आणि इंजेक्शन देण्याचा पर्याय सांगितला. ४ दिवस प्रतिदिन रुग्णालयात जाऊन तिला सलाईन लावून आम्ही घरी येऊ लागलो. त्या वेळी ‘ऑटो रिक्शा’ने प्रतिदिन जावे अन् यावे लागायचे. उपचार करणारे आधुनिक वैद्य ‘फॅमिली डॉक्टर’ असल्यामुळे त्यांचा उपचार लागू पडला आणि अल्प कालावधीमध्ये तिला बरे वाटू लागले. केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळेच आम्ही सुरक्षित राहिलो.