२५ सहस्र उद्योजक घडवण्याचे शासनाचे उद्दिष्ट ! – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी वर्ष २०२२ ते २०२३ साठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे राज्यात सुमारे २५ सहस्र उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ सहस्र तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले…
१. या योजनेत पूर्वी अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग आदींचा समावेश होता. आता इतर मागासवर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक आदी घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
२. १६ ते १९ जानेवारी या काळात दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत असून याद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली जाईल. विशेषतः विजेवर चालणारी वाहने, अन्नप्रक्रिया, सौरऊर्जा आदी क्षेत्रांत या वेळी गुंतवणूक करार करण्यात येईल. केंद्रशासनाच्या साहाय्याने राज्यात २ सहस्र २८० कोटींचे अन्नप्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प खासगी जागांवर होणार असून त्यासाठी शासन नियमांप्रमाणे प्रोत्साहन देणार आहे. याद्वारे २५ सहस्र रोजगार निर्माण होईल.