अशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे ?
‘जनन म्हणजे जन्म होणे. नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.
(लेखांक २)
१. अशुभ काळात जन्म झाल्यामुळे लागणारे दोष
पुढील सारणीत दिलेल्या योगांवर शिशूचा जन्म झाल्यास अशुभ काळासंबंधी दोष लागतो.
(संदर्भ : दाते पंचांग)
टीप १ – क्षयतिथी : ‘जी तिथी सूर्याेदयानंतर चालू होऊन दुसर्या दिवशीच्या सूर्याेदयापूर्वी संपते, म्हणजे कोणताच सूर्याेदय पहात नाही’, अशा तिथीला ‘क्षयतिथी’ म्हणतात.
टीप २ – ग्रहण पर्वकाल : सूर्य किंवा चंद्र ग्रहणाचा काळ
टीप ३ – सूर्यसंक्रमण पुण्यकाल : सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो, तो काळ.
टीप ४ – दग्धयोग, यमघंटयोग आणि मृत्यूयोग : तिथी, वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने निर्माण होणारे अशुभ योग
१ अ. अशुभ काळात जन्म झाल्यामुळे शिशूवर होणारे परिणाम : ‘प्रारब्धानुसार ज्या जिवांना अधिक कष्टाचे प्रसंग भोगायचे असतात’, अशा जिवांचा जन्म अशुभ काळात होतो. अशा जिवांना विशिष्ट ग्रहांची शक्ती अल्प प्रमाणात ग्रहण होते. अशुभ काळात जन्म झालेल्या जिवावर त्याच्या प्रारब्धाच्या तीव्रतेनुसार विविध त्रास होतात. मंद प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास त्याला पुनःपुन्हा ताप येणे, थकवा असणे, वाईट स्वप्ने पडणे आदी त्रास होतात. मध्यम प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास त्याचे चालणे किंवा बोलणे उशिरा चालू होणे, बुद्धीशी निगडित त्रास होणे आदी त्रास होतात. तीव्र प्रारब्ध असलेल्या जिवाचा जन्म अशुभ काळात झाल्यास शिक्षण इत्यादीत उशिरा रुची निर्माण होणे किंवा न होणे, तरुण वयात विविध प्रकारची व्यसने लागणे, सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास होणे आदी त्रास होतात. ज्योतिषशास्त्रात सांगितलेली जननशांती केल्यावर जिवाचे मंद आणि मध्यम प्रारब्ध काही प्रमाणात अल्प होते, तर तीव्र प्रारब्ध भोगण्यासाठी जिवाला ईश्वराकडून शक्ती मिळते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२२)
२. विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे लागणारे दोष
पुढील सारणीत दिलेल्या परिस्थितीत शिशूचा जन्म झाल्यास जननशांती केली जाते.
(संदर्भ : धर्मसिंधु)
२ अ. विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यावर जननशांती करावी लागण्यामागील कारण : ‘प्रत्येक जिवाचे प्रारब्ध वेगवेगळे असते. काही जिवांच्या प्रारब्धाची तीव्रता (कष्टाचे प्रसंग) इतरांच्या तुलनेत अधिक असते. त्या जिवांचा जन्म विशिष्ट परिस्थितीत होतो. संतती ‘जुळी’ किंवा ‘एकनक्षत्र’ असणे, हे तिचे कुटुंबियांतील संबंधित व्यक्तींशी देवाण-घेवाण संबंध अधिक असल्याचे दर्शक आहे. संतती ‘त्रिकप्रसव’ असणे, हे कुटुंबात पूर्वजांचा त्रास असल्याचे दर्शक आहे. शिशूला जन्मतः दात असणे किंवा अवयव चमत्कारिक असणे, हे त्याचे प्रारब्धचक्र गतीने चालू असल्याचे दर्शक आहे, म्हणजे जिवाला प्रारब्धभोग एकापाठोपाठ एक भोगावे लागतात. जन्मत: अवयव अल्प असणे, हे जिवाच्या जीवनात दुःखाचे प्रसंग अधिक असल्याचे दर्शवते. या प्रकारचे खडतर प्रारब्ध सहन करण्यासाठी काळदेवतेची, म्हणजे ग्रहांची सकारात्मक शक्ती मिळावी’, यासाठी हिंदु धर्मात जननशांती करण्याचे उपाय योजले आहेत.’
– श्री. निषाद देशमुख
३. जननशांती विधी केल्यामुळे शिशूला होणारे लाभ !
पुढील सारणीत दिले आहेत.
जननशांती विधीतून वरील सारणीत दिलेले सर्वच लाभ शिशूला प्राप्त होतील, असे नाही. शिशूचे प्रारब्ध आणि भाव यांनुसार त्याच्यावर अल्प किंवा अधिक परिणाम होतो. गुरूंच्या आज्ञेनुसार किंवा चांगली आध्यात्मिक पातळी असलेल्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली भावपूर्ण आणि परिपूर्ण रितीने हे विधी करणे आवश्यक आहे. वर्तमान कलियुगात भावपूर्ण आणि परिपूर्ण विधी करणारे पुरोहित मिळणे पुष्कळ दुर्मिळ आहे. असे असले, तरी या विधीच्या माध्यमातून धर्मशास्त्रानुसार आचरण म्हणजेच साधना होत असल्याने त्याचे फळ जिवाला निश्चितच मिळते.’
– श्री. निषाद देशमुख
४. जन्म झाल्यानंतर किती दिवसांनी जननशांती करावी ?
शिशूचा जन्म झाल्यानंतर बाराव्या दिवशी जननशांती करावी. त्या दिवशी शांतीसाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. बाराव्या दिवशी जननशांती करणे शक्य नसल्यास शिशूच्या जन्मनक्षत्रात चंद्र येईल त्या दिवशी किंवा अन्य शुभ दिवशी मुहूर्त पाहून शांतीकर्म करावे. जननशांती अधिक विलंबाने केल्यास तिची परिणामकारकता अल्प होते. त्यामुळे ती वेळेत करणे लाभदायक आहे.’ – श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |