‘नॉन स्टिक’ भांड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग ! – संशोधनातील निष्कर्ष
नवी देहली – तेल अल्प प्रमाणात वापरता यावे; म्हणून लोकांकडून ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर करण्यात येतो; मात्र या भांड्यांवरील आवरणामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. या भांड्यांच्या वापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनातून समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स आणि न्यू कैसल विश्वविद्यालयाच्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे.
१. भांड्यांवरील आवरणासाठी ‘पॉलीटेट्राफ्लूरोइथिलिन’ (पी.टी.एफ्.ई.) याचा वापर केला जातो. यामुळे तेल भांड्याला चिकटत नाही. याला ‘टेफ्लॉन’ असेही म्हटले जाते. ते ‘पेरफ्लुअरोऑक्टॅनॉइक ॲसिड’ (पी.एफ्.ओ.ए.) याद्वारे बनवले जाते. हे एक प्रकारचे रसायन आहे. यावर वर्ष २०१३ मध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच ‘नॉन स्टिक’ भांड्यांवर ‘पी.एफ्.ओ.ए. या रसायनाचा वापर करण्यात आलेला नाही’, अशी माहिती दिली जाते. असे जरी असले, तरी अन्य रसायनांचा वापर करण्यात आलेला असतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
२. या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यास त्यावरील रासायनिक आवरणातून सहस्रो कण निघून ते अन्नामध्ये मिसळले जातात. यासह या भांड्याला लहान भेग जरी असेल, तर त्यातून ९ सहस्र १०० प्लास्टिक कण बाहेर पडतात. या भांड्यांवरील आवरण हळूहळू निघू लागते. यामुळे सहस्रो प्लास्टिक कण बाहेर पडून तेही अन्नात मिसळतात. मोठ्या आचेवर यात अन्न शिजल्यावरही आवरण निघू लागते, तसेच धूरही निघू लागतो. यामुळे तो अन्नाला विषारी बनवतो.
३. या भांड्यांमध्ये सॉस, सूप, मटण, खीर किंवा मंद आचेवर बनवण्यात येणारे पदार्थ शिजवू नयेत. यात ऑम्लेट, तळलेले मासे, नूडल्स यांसारखे लवकर शिजणारे पदार्थ बनवता येतात.
पुढील प्रकारची हानी होऊ शकते !
१. ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’नुसार, ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर केल्यामुळे कर्करोगाची शक्यता बळावते.
२. मूत्रपिंडाविषयीचा आजार होण्याची शक्यता असते.
३. थायरॉईड होऊ शकतो.
४. प्रतिकार शक्ती न्यून होऊ शकते.
५. ‘आयरन’ची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे ‘ॲनिमिया’सारखा आजार होऊ शकतो.
६. ‘कॉग्निटिव डिसॉर्डर’, म्हणजे मेंदूच्या संदर्भात आजार होऊ शकतो.
‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर करतांना घ्यायची काळजी
१. ही भांडी वापरण्यापूर्वी त्यामध्ये प्रथम गरम पाणी घालून ती धुवून घ्यावीत.
२. या भांड्यांमध्ये कधीही मंद आचेवर जेवण बनवू नये.
३. जेवण बनवण्यापूर्वी ही भांडी गरम करू नयेत.
४. भांडी धुण्यासाठी प्लास्टिक किंवा नरम स्पंज यांचा वापर करावा.
५. ही भांडी घासतांना ती अधिक प्रमाणात घासू नयेत.
६. या भांड्यांवरील आवरण निघू लागल्यास त्यांचा वापर करू नये; कारण यांतील रसायनाचे हानीकारक भाग जेवणात मिसळून आरोग्याला घातक ठरतात.