धर्माचरण आवश्यक !
पू. भिडेगुरुजी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेल्या एका महिला पत्रकाराला ते म्हणाले, ‘‘प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे, अशी आमची भावना आहे आणि आमची भारतमाता विधवा नाही. प्रथम कुंकू लावून ये, मग तुझ्याशी बोलतो.’’ या प्रसंगानंतर सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या विविध प्रतिक्रियात्मक विचार वाचल्यानंतर भारतियांची विचारसरणी कोणत्या दिशेने चालली आहे, याची जाणीव होते. ही विचारसरणी निश्चितच समाज किंवा वैयक्तिकदृष्ट्या विचार केला, तरी हितकारक नाही, हे नक्की ! अशी विचारसरणी समाज, पर्यायाने देशाची प्रगती घडवून आणण्यास बाधक आहे, हे सत्य आहे. याचाच अर्थ संपूर्ण समाजाची हीच विचारसरणी आहे, असेही नाही. तरीही समाजातील ही धर्मविरोधी विचारांची कीड वेळीच बाजूला करणे आवश्यक आहे.
पू. भिडेगुरुजींचे विचार ऐकल्यानंतर खरेतर सर्वांच्याच मनामध्ये पुष्कळ सकारात्मक भावना जागृत होणे अपेक्षित होती; कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात भारतमाता आणि महिला यांच्याविषयी एवढी पराकोटीची अन् सन्मानाची भावना असू शकते, हेच कौतुकास्पद आहे. प्रत्येकच व्यक्तीमध्ये भारतमाता आणि महिला यांच्याविषयी पू. भिडेगुरुजी यांच्यासारखी भावना असायला हवी, असेच प्रत्येक भारतियाला मनापासून वाटले असणार. ही भावना केवळ महिलादिनाच्या एका दिवसापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक क्षणी मनात असायला हवी. अशी भावना मनात असेल, तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण नक्कीच न्यून होण्यास साहाय्य होईल.
महिलांनीही ‘आपण भारतमातेचे रूप आहोत, श्री दुर्गादेवीचे तत्त्व आपल्यात आहे’, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले आचरण कसे होईल ? हे पहायला हवे. धर्माने सांगितलेली प्रत्येक कृती आदर्श होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ‘कपाळावर कुंकू लावणे म्हणजे आपल्यातील देवीतत्त्वाची पूजा करणे’, असे हिंदु धर्मात सांगितले आहे. धर्माचरण केल्याने धर्माचे पर्यायाने आपले रक्षण होणार आहे. पाश्चात्त्यांच्या प्रभावाने आपण आपला धर्म, संस्कृती यांपासून दूर चाललो आहोत आणि त्यामुळेच समाजाची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो, हे सदैव लक्षात ठेवून धर्माचीच कास धरूया.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी