स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना हाल हाल करून मारणार्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात ? – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण करणार्या आव्हाडांना दवे यांचा प्रश्न
पुणे – ‘हर हर महादेव’च्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात ? बाबासाहेब पुरंदरे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे का ? बाबासाहेबांच्या कोणत्या लेखात असा उल्लेख आहे ? चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करत आहात ? राजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचे पाप तुम्ही आणि तुमचे सहकारी वारंवार करत आहात. छत्रपतींची हत्या करायला आलेल्या अफझलच्या धर्मावर कधी बोलणार आहात ? स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना हाल हाल करून मारणार्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात ? का केवळ पुरंदरेच दिसतात तुम्हाला ? द्या याची उत्तरे. आम्ही सिद्ध आहोत. तुमच्या समवेत जाहीर चर्चा करायला. तुम्ही सिद्ध आहात का चर्चेला ?, असे आव्हान ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे. (याविषयी आव्हाड यांची काय भूमिका आहे, हे त्यांनी जाहीर करावे ? – संपादक)
‘गेल्या ६०-७० वर्षांत मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे असंख्य प्रयत्न ब.मो. पुरंदरे आणि त्यांच्या देशी-विदेशी शिष्यांनी हेतूपुरस्सर केले. ज्यात महाराजांना ब्राह्मणशाहीच्या अधीन असणारा एक मुसलमानद्वेष्टा राजा अशा रूपात दाखवले गेले’, असे आव्हाड यांनी म्हटले होते. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या अनुषंगाने आव्हाड यांनी वरीलप्रकारे भाष्य केल्यानंतर त्याला आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आनंद दवे पुढे म्हणाले की, या चित्रपटाला सर्वांत प्रथम विरोध आम्ही केला. तुम्हाला जागे व्हायला संभाजी राजे यांचे वक्तव्य यावे लागले ? चित्रपट चुकला आहे हे निश्चितच; पण त्या आडून घाणेरडे जातीय राजकारण करू नका. एवढी वर्षे सत्तेत आहात. का नाही एक समिती स्थापन केली खरा इतिहास शोधायला ?