विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत न डगमगता पुढे जाण्याचा संकल्प करावा ! – कपिलदेव मिश्र, कुलपती, राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर
जबलपूर येथे राणी दुर्गावती विश्वविद्यालयाच्या ‘प्रवेश उत्सवा’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
जबलपूर (मध्यप्रदेश) – युवा पिढी वैज्ञानिक आधारावर प्रमाणित गोष्टींनाच स्वीकारते. तसे पाहिले, तर आपले अध्यात्म आणि संपूर्ण भारत वैज्ञानिकतेने ओतप्रोत भरलेला आहे. शिक्षणासमवेत मूल्यांचाही विकास झाला पाहिजे, असे आम्हाला वाटते. यासाठी प्रत्येक विभागात अशा प्रकारे उद्बोधन आयोजित करण्यात आले पाहिजे. दगड दगडच असतो; पण त्याने टाकीचे घाव सहन केले, तर त्याची मूर्ती बनते आणि त्याने ते घाव सहन केले नाही, तर त्याचे तुकडे होतात. असे तुटलेले दगड पायर्यांमध्ये लावले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनाच्या कठीण परिस्थितीत न डगमगता पुढे जाण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन राणी दुर्गावती विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. कपिलदेव मिश्र यांनी केले. येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयाच्या वतीने नवप्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘प्रवेश उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला ते संबोधित करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.
आपल्या संस्कृतीची वैज्ञानिकता समजून घेऊन ती आचरणात आणली पाहिजे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा व्यापक विचार संस्कृत भाषा आणि संस्कृती यांची देण आहे. पाश्चात्त्य संस्कृती विश्वाला व्यवसाय समजते, तर भारत विश्वाला एक कुटुंब समजतो. आपली संस्कृती अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देते. अशा वेळी मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे, यात कोणती वैज्ञानिकता आहे ? आज संपूर्ण जग विश्वशांतीसाठी हिंदु संस्कृतीचा अभ्यास करत आहे. अशा स्थितीत आपण हिंदु संस्कृतीची वैज्ञानिकता समजून ती आचरणात आणली पाहिजे.