केवळ ४ वर्षे सेवा आणि साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया. ११ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गुरुवर्यांनी ४ वर्षांत संतपदावर आरूढ करण्याची कृपा कशी केली ?’, याचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
हे लिखाण सद्गुरु डॉ. वसंत आठवले संत होण्यापूर्वीचे असल्याने या लेखातील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही ! – संपादक
मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/626976.html
२. ‘गुरुवर्यांनी ४ वर्षांत संतपदावर आरूढ करण्याची कृपा कशी केली ?’, याविषयी विचार करतांना जाणवलेली सूत्रे
२ ई. सनातनवर संकटे येण्याचा संभव असतांना अनेक संतांनी साहाय्य करणे आणि यावरून ‘परमेश्वराची गुरुवर्यांवर पूर्ण कृपादृष्टी आहे’, हे लक्षात येणे : ‘सनातनवर संकटे येण्याची संभावना असतांना त्यांनी त्याला धैर्याने तोंड कसे दिले ? साधकांचे मनोधैर्य कसे टिकवून ठेवले ?’, यांविषयी मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांचे कार्य ईश्वरी असल्याने अशा संकटांच्या वेळी प.पू. डॉ. काटेस्वामीजी, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. नाना काळे आदी संत स्वप्रेरणेने गुरुवर्यांच्या साहाय्याला धावून आले. हिमालयातील काही गुरूंनी त्यांच्या भारतात असलेल्या शिष्यांना सूक्ष्मातून संदेश दिले आणि सनातनशी पूर्वीची ओळख नसलेले अनेक संत सनातनच्या अन् गुरुवर्यांच्या साहाय्यासाठी आल्याचे मी अनुभवले. यावरून ‘परमेश्वराची गुरुवर्यांवर पूर्ण कृपादृष्टी आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि या श्रेष्ठ संत-मंडळींचे श्रेष्ठत्व, त्यांचे विविध साधनामार्ग अन् वैशिष्ट्ये यांचा परिचय झाला.
२ उ. परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या महान अवताराची वैशिष्ट्ये समाजाला कळण्यासाठी त्यांचे चरित्र प्रकाशित होण्याचे महत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांना पटवून देणे : प.पू. डॉक्टरांची अनेक वैशिष्ट्ये माझ्या लक्षात आल्यावर मी गुरुवर्यांना ‘तुमची ही सर्व वैशिष्ट्ये लोकांच्या लक्षात येण्यासाठी तुमचा चरित्रपर ग्रंथ प्रकाशित होणे आवश्यक आहे’, हे पटवून दिले. सध्या उपलब्ध असलेल्या त्यांच्या कार्याचा १ सहस्र पृष्ठांचा ग्रंथ होईल; म्हणून तो ५ – ६ खंडांत प्रसिद्ध करण्याचे ठरवले. साधकांना संत बनवणे, हिंदूसंघटन आणि त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन, हिंदु धर्माचा प्रसार, प्रत्येक आठवड्याला दिसून येणारे दैवी चमत्कार, उदा. दैवी कण, दैवी नाद, प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील वस्तू आपोआप हलणे आणि त्यांचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन, वाईट शक्तींवरील उपायांचे संशोधन इत्यादी अनेकविध क्षेत्रांत सतत कार्य अन् संशोधन चालू असल्यामुळे गुरुवर्यांच्या चरित्राचे ग्रंथ प्रत्येक १ – २ वर्षांनी नव्याने लिहावे लागतील. त्याला पर्याय नाही; कारण ‘प्रत्येक १ – २ वर्षांनी ग्रंथ लिहिण्याइतकी नवीन माहिती मिळणे’, असे आतापर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही संतांच्या संदर्भात घडलेले नाही. ही अद्वितीय माहिती लोकांपर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे.
(‘सनातन संस्थेने पुढील ४ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.’ – संकलक)
१. ‘परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय आणि संतांनी केलेला गौरव
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’
२ ऊ. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकांनी आवड-निवड आणि क्षमता यांप्रमाणे साधना करणे : गुरुकृपायोगामध्ये ज्ञान, कर्म, भक्ती आणि ध्यान हे चारही योग सामावलेले आहेत. प्रत्येक साधकाची आवड-निवड आणि क्षमता यांप्रमाणे साधक साधना करतात. माझी साधना प्रामुख्याने ज्ञानयोगाची आहे.
३. ‘गुरुदेवांनी पूर्वीपासूनच कोणती साधना करवून घेतली ?’, याचे मनन करतांना लक्षात आलेली सूत्रे
‘गुरुदेवांनी पूर्वीपासूनच माझ्याकडून कोणती साधना करवून घेतली ?’, यासंबंधी मनन करतांना माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहे.
अ. ३० वर्षांपूर्वी तर्कतीर्थ आणि वेदांताचार्य रानडेशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मातील मूळ तत्त्वांचा अभ्यास केल्याने ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा पाया घातला गेला होता.
आ. आयुर्वेदातही दैवी चिकित्सा, वैद्याची कर्तव्ये आणि अध्यात्माला धरून आयुर्वेदाची सर्व मांडणी असल्यामुळे मी थोड्या प्रमाणात का होईना अध्यात्माच्या संपर्कात राहिलो.
इ. गुरुवर्यांनी मथळ्यांची अनुक्रमणिका लावणे आणि भाषांतर करणे, या सेवा दिल्यामुळे अध्यात्मातील नवीन ज्ञान अन् संशोधन यांचा अभ्यास झाला.
माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये वरील ३ सूत्रांचा २० टक्के एवढाच वाटा आहे.
४. ‘गुरुवर्यांचा अभ्यास करणे’, हीच माझी खरी साधना !
‘गुरुवर्यांचा अभ्यास करणे’, हीच माझी खरी साधना असून माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये या सूत्राचा ८० टक्के एवढा वाटा आहे. त्यामुळे गुरुवर्यांना अपेक्षित असे माझ्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन माझ्या नकळत झाले असावे. ‘मी गुरुवर्यांचा अभ्यास कशा प्रकारे केला ?’, हे पुढे दिले आहे.
४ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वांना मार्गदर्शन कसे करतात ? संशोधन कसे करतात ?’, या सर्वांचा अभ्यास, म्हणजेच गुरुदेवांचा अभ्यास ! : ‘गुरुवर्य निरनिराळ्या क्षेत्रांतील साधक, तसेच संत यांना कसे मार्गदर्शन करतात ? सनातनच्या साधकांकडून गुरुकृपायोगानुसार साधना करून घेऊन त्यांना संत कसे बनवतात ? गुरुवर्यांचे चालणे-बोलणे कसे असते ? ते स्वतःचे कुटुंबीय, साधकांचे नातेवाईक, सामान्य माणसे आणि लहान मुले यांच्याशी कसे वागतात ? संशोधन कसे करतात ?’, या सर्वांचा अभ्यास, म्हणजेच गुरुदेवांचा अभ्यास ! त्यातही माझ्या काही शंका असल्यास गुरुवर्य माझे समाधान होईपर्यंत त्या शंकांचे निरसन करतात.
४ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रसंग, व्यक्ती आणि गुरु यांविषयी कसे विचार करतात ? निरनिराळे प्रसंग कसे हाताळतात ?’, हे शिकायला मिळणे : संतांच्या चरित्राचे वाचन आणि अभ्यास करणे मला पहिल्यापासून आवडायचे. माझ्या जिज्ञासेमुळे गुरुवर्य रामनाथी आश्रमात घडणार्या नवीन घटना, संतांनी आश्रमाला दिलेली भेट, नवीन अनुभूती यांची माहिती मला प्रत्येक ४ – ५ दिवसांनी पुरवतात. त्या वेळी ‘ते प्रसंग, व्यक्ती आणि गुरु यांविषयी कसे विचार करतात ? निरनिराळे प्रसंग कसे हाताळतात ?’, हेही शिकायला मिळते.
४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली सेवा करतांना शरिराने त्यांच्यापासून दूर असूनही मनाने सतत त्यांच्या संपर्कात असणे : मी केवळ गुरुवर्यांशी दूरभाषवरून बोलतांनाच नव्हे, तर त्यांनी दिलेली सेवा करतांना शरिराने जरी मी त्यांच्यापासून दूर असलो, तरी मनाने सतत त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे ‘गुरुवर्यांचा अभ्यास’, हीच माझी खरी साधना आहे.
४ ई. ‘गौतम बुद्धांच्या देहात अडकलेल्या त्यांच्या मोठ्या चुलत भावाप्रमाणे गुरुवर्यांच्या देहबुद्धीत न अडकण्यासाठी सनातनच्या संकटकाळात श्रीकृष्णाने मला त्यांच्यापासून देहाने दूर ठेवले असावे’, असे वाटणे : भगवान बुद्धांचा चुलत भाऊ आनंद त्यांच्यापेक्षा २ वर्षांनी मोठा होता. संन्यास घेऊन त्यांचा शिष्य बनतांना त्याने भगवान बुद्धांना अट घातली, ‘कोणत्याही परिस्थितीत तू शिष्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करत असतांना किंवा तुला राजमहालात किंवा इतर ठिकाणी बोलावले असतांना मी सतत तुझ्यासह असणार. तू मला धर्मप्रसारासाठी बाहेर कुठेही पाठवायचे नाही.’ बुद्धांनी त्याची अट मान्य केली. बुद्धांच्या महानिर्वाणाची वेळ जवळ आली. भगवान बुद्ध जिवंत असतांना त्यांच्या शेकडो शिष्यांची जन्म-मृत्यूतून सुटका होऊन त्यांना निर्वाणप्राप्ती झाली होती. आनंदने भगवान बुद्धांना विचारले, ‘‘सारिपुत्र आदी तुझे शेकडो शिष्य मोक्षाला गेले आणि मी सतत तुझ्या जवळ असतांना अन् तू सांगितलेली साधना करत असतांना मी अजून मोक्षाला कसा नाही गेलो ? आता तू देह सोडल्यावर माझे कसे होणार ?’’ तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ‘‘तू सतत माझ्याजवळ राहिलास; म्हणूनच तू माझ्या देहबुद्धीत अडकलास. आता मी दूर गेल्यानेच तू माझ्या बंधनापासून मुक्त होऊन मोक्षाला जाशील.’’ आनंदप्रमाणे मी गुरुवर्यांच्या देहबुद्धीत अडकू नये; म्हणून कदाचित् सनातनवरील संकटाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने मला गुरुवर्यांपासून देहाने दूर ठेवले असावे.’
।। श्री गुरुः शरणम् ।।
(समाप्त)
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (आषाढ अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (६.८.२०१३))
|