निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिकवलेल्या बिंदूदाबन उपचारपद्धतीमुळे श्री. दिलीप नलावडे यांना झालेले लाभ !
‘निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी साधकांना बिंदूदाबन उपचारपद्धत शिकवण्यासाठी आणि साधकांवर उपचार करण्यासाठी अधून-मधून सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे येतात. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे मला होत असलेले त्रास बरे झाले. त्याविषयी मला आलेले अनुभव येथे दिले आहेत.
१. निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांनी शिकवलेले उपचार केल्यामुळे झालेले लाभ !
१ अ. एकदा दुपारी उचकी आल्यावर ती अनेक उपाय करूनही न थांबणे, तेव्हा निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांनी बिंदूदाबन करून तीन चुळा भरून ते पाणी पिण्यास सांगणे, तसे केल्यावर उचकी थांबणे : ‘१.५.२०२२ या दिवशी दुपारी पाणी पित असतांना मला उचकी आली. बराच वेळ उपाय करूनही उचकी थांबत नव्हती. तेव्हा निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी संगणकावर सेवा करत होते. मी त्यांना उचकी थांबत नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझ्या उजव्या हाताच्या तळव्यावर बिंदूदाबन केले. नंतर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही एक पेला पाणी घेऊन या. पाणी पिण्यापूर्वी मनातल्या मनात ‘उचकीचे औषध, तीन चुळा पाणी’, असे तीन वेळा म्हणा आणि तोंडातल्या तोंडात चुळा भरून तेच पाणी तीन वेळा प्या.’’ त्याप्रमाणे मी कृती केल्यावर माझी उचकी लगेचच थांबली.
१ आ. बिंदूदाबनामुळे पायात आलेला गोळा जाणे : एक दिवस पहाटे झोपेत असतांना माझ्या डाव्या पायाच्या पोटरीमध्ये अकस्मात् गोळा आला. तेव्हा डॉ. जोशी यांनी शिकवलेल्या उपचाराची मला आठवण झाली. मी लगेच दोन्ही हाताची तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) दुमडून त्यांवर अंगठ्याने दाब दिला. काही सेंकदातच माझ्या पायात आलेला गोळा गेला.
१ इ. निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांनी शिकवलेले व्यायाम प्रकार केल्यावर पाठदुखीचा त्रास उणावणे : मला बर्याच वर्षांपासून पाठदुखीचा त्रास आहे. दोन मासांपूर्वी निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांनी ‘हा त्रास न्यून व्हावा’, यासाठी मला दोन व्यायाम प्रकार शिकवले. ते व्यायाम नियमित केल्यामुळे माझा त्रास ६० टक्के उणावला.
१ ई. अपचनाचा त्रास उणावणे : मला अपचनाचा त्रास आहे. मला सकाळी लवकर शौचाला होत नाही. त्यासाठी नेहमी मला औषध घ्यावे लागत असे. निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांनी माझा हा त्रास न्यून होण्यासाठी मला उपचार सांगितले, ‘‘सकाळी उठल्यानंतर दोन पेले कोमट पाणी प्यायचे. नंतर २० मिनिटे वज्रासनात बसून दोन्ही हातांची तर्जनी दुमडून तिच्यावर अंगठ्याने दाब द्यायचा. मी असे केल्यावर आता मला १० मिनिटांतच शौचाला होते.
२. आपत्काळातील संजीवनी असलेली बिंदूदाबन उपचारपद्धत
तीव्र आपत्काळामध्ये ही उपचारपद्धत साधकांसाठी संजीवनी ठरणार आहे. डॉ. दीपक जोशी यांनी काही आसने स्वतःच सिद्ध केली आहेत. येणार्या तीव्र आपत्काळामध्ये ‘साधकांनी स्वावलंबी व्हावे आणि स्वतःच्या आजारावर स्वतःच उपचार करावेत’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बिंदूदाबन या उपचारपद्धतीवर ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’ आणि ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’ हे २ ग्रंथ संकलित केले आहेत. बिंदूदाबन उपचारपद्धतीवर ‘हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)’ हा लेखक श्री. विनायक महाजन आणि वैद्य मेघराज पराडकर यांनी संकलित केलेला ग्रंथही सनातनने प्रकाशित केला आहे.
‘गुरुदेवा, तुम्हीच निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी यांच्यासारखे साधक घडवून आम्हा साधकांना येणार्या आपत्काळात होणार्या आजारांना सामोरे जाण्यासाठी बिंदूदाबन उपचारपद्धत शिकवलीत. त्याबद्दल आपल्या श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. दिलीप नलावडे, फोंडा, गोवा. (८.५.२०२२)