सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव असलेले ईश्वरपूर (सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा (वय ८९ वर्षे)) !

पू. राजाराम नरुटे
श्री. शंकर नरुटे

१. देव आणि मंदिरे यांच्याप्रती पू. आबांचा भाव

‘आमच्या शेतात जाण्याच्या मार्गावर सूर्य-चंद्र यांचे लहानसे मंदिर होते. काही भाविक ‘या मंदिराची पुनर्बांधणी करून त्याचा विस्तार करूया’, असे म्हणत होते. तेव्हा पू. आबा म्हणाले, ‘‘मंदिर बांधूया. बांधकामास लवकरच आरंभ करूया.’’ त्या वेळी त्यांनी स्वतःकडील १० रुपये भाविकांना दिले आणि म्हणाले, ‘‘मंदिरासाठी माझे पहिले अर्पण घ्या.’’ त्यानंतर त्या मंदिरासाठी मोठमोठ्या देणग्या मिळाल्या आणि ते मंदिर बांधून पूर्ण झाले. यातून पू. आबांचा देव आणि मंदिर यांच्याप्रती असणारा भाव अन् ‘आपल्याकडे जे आहे’, ते देऊन इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती लक्षात येते.

२. पू. आबांचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काही ठाऊक नसतांनाही किंवा त्यांना कधी पाहिले नसतांनाही मुलाला  त्यांच्याविषयी विचारणे : पू. आबा संतपदी विराजमान होण्यापूर्वी ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कधीच भेटले नव्हते आणि मीही पू. आबांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी काही सांगितले नव्हते. पू. आबांना संस्थेविषयी फार काही ठाऊक नव्हते, तरीही मी घरी गेल्यावर ते परात्पर गुरु डॉक्टरांची विचारपूस करायचे. मला काही सूत्रे सांगतांना ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांना विचारून घे’, असे मला सांगायचे. पू. आबांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्याप्रती आधीपासूनच भाव होता.

२ आ. सनातन संस्थेवर संभाव्य बंदीचे संकट असतांना लोकांना ‘सनातन संस्थेचे कार्य कसे चांगले आहे’, हे सांगणे : काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेवर संभाव्य बंदीचे संकट होते. तेव्हा विविध वर्तमानपत्रांतून सनातन संस्थेच्या विरुद्ध वृत्ते येत होती. गावातील लोक पू. आबांना ‘शंकरला (मुलाला)  सनातन आश्रमातून बोलावून घ्या’, असे सांगायचे. तेव्हा पू. आबा त्यांना योग्य उत्तर द्यायचे आणि ‘सनातन संस्थेचे कार्य कसे चांगले आहे’, हे लोकांना सांगायचे.

२ इ. सनातन संस्थेच्या कार्याला विरोध होत असतांनाही मुलाला ‘तू तुझे कार्य करत रहा’, असे सांगणे : मी घरी गेल्यावर पू. आबा मला गावातील लोकांनी त्यांना विचारलेले प्रश्न आणि पू. आबांनी त्यांना दिलेली उत्तरे याविषयी सांगायचे. ते मला म्हणायचे, ‘‘विरोध होणारच; पण तू तुझे कार्य करत रहा. प्रत्येक संतांनाही विरोध झाला आहे.’’

परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. आबा यांचे जन्मोजन्मीचे नाते असल्याप्रमाणे पू. आबांचे विचार आधीपासूनच साधनेला पूरक होते; पण आमच्या ते लक्षात येत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. आबांना संतपद प्राप्त झाले आणि आम्हाला त्याची जाणीव झाली.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा, आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०२२)