६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या कु. अपाला औंधकर हिने केलेला भावप्रयोग
३.३.२०२१ या दिवशी दैवी बालकांच्या सत्संगात कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक स्तर ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या स्वच्छतेच्या संदर्भात पुढील भावप्रयोग करवून घेतला. त्या वेळी तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. वार्यामुळे खोलीत अनेक धुलीकण येत असल्याने चैतन्यमय असलेल्या गुरुगृहाची म्हणजे प.पू. गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करण्याचे ठरवणे
‘आज आपण सर्व जण सामूहिक पद्धतीने सेवा करणार आहोत. आता आपण गुरुलोकातील गर्भगृहात जाऊया आणि साक्षात् गुरुगृहाची, म्हणजे गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करूया. ही सेवा मिळाली; म्हणून आपल्याला अत्यानंद होत आहे. त्या आनंदातच आपल्या मनात एक विचार येत आहे, ‘गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करण्याची खरोखरच काही आवश्यकता आहे का; कारण तेथील प्रत्येक कण, लादी आणि भिंत यांत निर्गुण तत्त्व आहे आणि ती खोली म्हणजे एक दिव्य पोकळी आहे.’ त्या वेळी आपल्याला सूक्ष्मातून उत्तर मिळते, ‘वार्यामुळे खोलीत अनेक धुलीकण येत असल्याने खोलीची स्वच्छता करणे आवश्यक आहे.’
२. स्वच्छता करण्यापूर्वी मन आनंदी झाले असून स्वच्छतेच्या वस्तूही गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या असणे
आता आपण गुरुदेवांच्या खोलीत गेलो आहोत. आपले मन पुष्कळ आनंदी झाले आहे. आपण स्वच्छता करण्यासाठी लहान झाडू, मोठा झाडू, बालदी, मग इत्यादी वस्तू घेतल्या आहेत. त्या सर्व वस्तू गुरूंच्या कक्षात जाण्यासाठी अणि गुरुदर्शनासाठी पुष्कळ आतुर झाल्या आहेत. त्यांच्यातील तो उत्कट भाव गुरुचरणी पोचत आहे.
३. खोली स्वच्छता करतांना आपले मन आणि देह यांची स्वच्छता होत असल्याचे जाणवून श्रीविष्णूच्या चरणांनी पावन झालेल्या त्या खोलीत कृतज्ञताभाव अनुभवणे
आपण गुरुदेवांच्या खोलीत प्रवेश केला आहे. तेथे सर्वत्र पांढरा प्रकाश पसरलेला आहे. आपण खोलीची स्वच्छता करण्यास आरंभ केला आहे. त्या वेळी आपल्या लक्षात आले की, खोली स्वच्छता हा एक दिव्य अनुभव आहे; कारण खोली स्वच्छता करतांना आपले मन आणि देह यांची स्वच्छता होत आहे. या खोलीत परात्पर गुरुदेव सतत समष्टी सेवा करतात. ‘अशा या श्रीविष्णूच्या चरणांनी पावन झालेल्या खोलीत आता आपण आहोत’, या विचाराने कृतज्ञताभाव अनुभवता येत आहे.
४. खोलीच्या खिडकीच्या काचेवर धुके पसरल्याने बाहेरील दृश्य दिसण्यास अडथळा येणे, धुके पुसल्यावर ते गुरूंच्या निर्गुण रूपाशी एकरूप होणे, तसेच आपल्या मनावरील स्वभावदोष आणि अहंचे धुके नष्ट केल्यावर आपल्यालाही गुरुदेवांशी एकरूप होता येणार असल्याचे जाणवणे
गुरुदेवांच्या खोलीतील खिडकीच्या काचेवर बाहेरच्या बाजूने धुके पसरले आहे. त्याच्याकडे पाहून ‘आपलीही त्याच्याप्रमाणेच स्थिती आहे’, असे वाटले. ते धुके खिडकीला चिकटून बसल्यामुळे काचेतून बाहेरचे दृश्य पहाण्यास अडथळा येत होता. त्याप्रमाणेच आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे (यांच्या धुक्यामुळे) आपल्याला साधनेत अडथळे येतात. आपल्याला गुरुचरणांना सोडून जायचे नसते. आता आपण खिडकीवरील धुके हळूवारपणे पुसत आहोत. तेव्हा धुक्याला वाटते, ‘अरेरे, मला पुसून टाकले !’ त्याच वेळी त्याच्या लक्षात येते, ‘माझे अस्तित्व जरी नष्ट झाले, तरी मी आता गुरुदेवांच्या निर्गुण अस्तित्वाशी (रूपाशी) एकरूप झालो आहे.’ त्याप्रमाणे ‘आपल्यालाही आपले सारे स्वभावदोष आणि अहं नाहीसा करून गुरुदेवांच्या निर्गुण रूपाशी एकरूप व्हायचे आहे’, याची आता आपल्याला जाणीव होत आहे.
५. केर काढतांना धुलीकण आनंदाने नृत्य करतांना दिसणे आणि त्यांच्याकडे पाहून भावजागृती होणे
त्यानंतर आम्ही खोलीतील केर काढू लागतो. तेव्हा खोलीतील धुलीकण आनंदाने नृत्य करतांना आपल्याला दिसत आहेत. ‘ते का बरं आनंदाने उड्या मारत आहेत ?’, असे वाटत असतांनाच लक्षात येते की, ‘ते गुरूंच्या चरणांची धूळ बनले आहेत; म्हणून ते आनंदाने उड्या मारत बागडत आहेत.’ त्यांना ठाऊक आहे की, ते कचरा पेटीत जाणार आहेत; परंतु त्याचे त्यांना दुःख नाही, तर आनंदच होत आहे. धुलीकण सुपलीत भरतांना त्यांच्याकडे पाहूनच आपला भाव जागृत होत आहे.
६. प्रतिदिन गुरुदेवांचा हस्तस्पर्श झाल्याने कृतज्ञताभावात असलेले खोलीतील खिडक्यांचे पडदे धुतांना आम्हीही कृतज्ञताभावाच्या सागरात डुंबणे
आता आपण खोलीतील पडदे धूत आहोत. ते पडदे आपल्याला काहीतरी सांगत आहेत. ते म्हणत आहेत, ‘मला प्रतिदिन गुरुदेवांचा हस्तस्पर्श होतो. त्यामुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ त्यांचे हे बोल ऐकून आपणही कृतज्ञताभावाच्या सागरात डुंबून जातो.
७. चैतन्य आणि दिव्यत्व असलेल्या या खोलीची स्वच्छता झाल्यावर मन हलके आणि आनंदी होणे
खोलीची स्वच्छता झाल्यावर लक्षात येते की, खोलीची स्वच्छता झाली. त्याचसमवेत इथले चैतन्य आणि दिव्यत्व यांमुळे आपले मनही पुष्कळ हलके झाले आहे. तसेच साक्षात् श्रीमन्नारायणाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमुळेच मन आनंदी अन् हलके झाले आहे.
८. खोलीतील पावन भूमीवर डोके टेकवतांना ध्यानाची अनुभूती येणे आणि गुरुदेवांचा नाद कानी आल्यावर साक्षात् भगवंत प्रकट झाल्याचे पाहून देहभान विसरून जाणे
आता आपण त्या पावन भूमीवर डोके ठेवले आहे. त्या वेळी आपल्याला ध्यानाची अनुभूती येत आहे. अकस्मात् त्या ध्यानात गुरुदेवांचा नाद आपल्या कानी येतोय. ध्यानातून बाहेर आलो आणि पहातो, तर काय ? ‘साक्षात् भगवंत, ज्ञानसूर्य प्रकटला आहे !’ ते पाहून आपण देहभान विसरून गेलो आहोत. मग अश्रू तरी कसे वहाणार ? आपण आणि गुरुदेव एकरूप झाल्याची अनुभूती येत आहे.
कृतज्ञता !’
|