मराठीतील काही परकीय आणि त्यांना पर्यायी स्वकीय शब्द अन् त्यांचा वापर
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘मराठी भाषेला लागलेले हिंदी भाषेचे वळण, ‘पोहोचणे’ हा हिंदी शब्द आणि ‘इसवी सन’ हा अरबी शब्द यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही परकीय शब्द पाहू. (लेखांक १५ – भाग ३)
लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/621773.html
४. नित्य वापरातील काही परकीय शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द
(टीप : या सूत्रातील ‘४ अ’ हे उपसूत्र शुक्रवार, १४.१०.२०२२ या दिवशीच्या, तर ‘४ आ’, ‘४ इ’, ‘४ ई’ आणि ‘४ उ’ ही उपसूत्रे शुक्रवार, २१.१०.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)
४ ऊ. ‘महिना’ या फारसी शब्दाच्या जागी ‘मास’ हा स्वकीय शब्द वापरणे : ‘महिना’ हा फारसी शब्द मराठी भाषेमध्ये एवढा रुळला आहे की, तो परकीय आहे, हे बर्याच मराठी भाषिकांना ठाऊकही नाही. या शब्दाच्या जागी ‘मास’ हा स्वकीय शब्द वापरावा; मात्र ‘महिनाभर’ असा शब्द लिहायचा असल्यास ‘मासभर’ असे लिहू नये. ते वाचायला चांगले वाटत नाही. त्या ठिकाणी ‘एक मास’ असे लिहावे.
४ ए. ‘धर्मपत्नी’ हा हिंदी वळणाचा शब्द न लिहिता केवळ ‘पत्नी’ असे लिहिणे योग्य असणे : मराठी भाषेत ‘पती’ आणि ‘पत्नी’ असे शब्द आहेत. हिंदी भाषेमध्ये ‘धरमपत्नी’ असे म्हणण्याची पद्धत आहे. तिच्या प्रभावामुळे मराठी लोकही ‘धर्मपत्नी’ हा शब्द वापरू लागले आहेत. तो टाळायला हवा. ‘जी स्त्री विवाहानंतर पतीच्या संदर्भातील कौटुंबिक आणि सामाजिक धर्मकर्तव्यांचे पालन करते, तिच्यासाठी ‘पत्नी’ ही संज्ञा वापरली जाते.’ केवळ ‘पत्नी’ या शब्दातूनही हा बोध होतो. त्यामुळे ‘धर्मपत्नी’ या शब्दातील ‘धर्म’ हा शब्द अनावश्यक आहे.
४ ऐ. ‘संकेतस्थळाला भेट देणे’ नव्हे, तर ‘संकेतस्थळ पहाणे’, असे म्हणणे योग्य असणे : सध्याच्या माहिती महाजालाच्या (इंटरनेटच्या) युगात अनेक प्रकारची संकेतस्थळे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. संकेतस्थळांच्या संदर्भात इंग्रजी भाषेत ‘visit our website’ असे लिहिलेले असते. मराठी लिहिणारे लोक त्याचे जसेच्या तसे भाषांतर करत ‘आमच्या संकेतस्थळाला भेट द्या’, असे लिहितात. मराठी भाषेत ‘भेट देणे’ म्हणजे ‘एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित रहाणे’ होय. यानुसार आपण संकेतस्थळाला ‘भेट देत’ नाही, तर संकेतस्थळ ‘पहातो’. त्यामुळे संकेतस्थळाच्या संदर्भात ‘भेट देणे’ या इंग्रजाळलेल्या शब्दप्रयोगाऐवजी ‘पहाणे’ हा शब्द वापरावा, उदा. ‘शंभर जणांनी आमचे संकेतस्थळ पाहिले’, असे म्हणावे.
४ ओ. काही परकीय शब्द, त्यांच्यापुढे कंसात ते ज्या भाषांतून आले आहेत, त्यांची नावे आणि त्या शब्दांसाठी वापरायचे स्वकीय शब्द
परकीय आणि स्वकीय शब्दांविषयी अधिक विवेचन कै. रामदासस्वामी सोनार, जळगाव यांनी लिहिलेल्या ‘अभारतीय शब्दकोश’ या ग्रंथात दिले आहे.’ (समाप्त)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)