माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या सुटकेचा अन्वयार्थ !
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे. यात ‘६ दोषींची कारागृहातील वर्तणूक चांगली आहे, अशा प्रकारची कारणे दिली गेली आहेत’, असे आतातरी दिसते.
१. तमिळ अस्मिता या ६ जणांना हत्यारे मानते का ?
आता हे ६ जण बाहेर येतील. त्यांच्यापैकी एक नलिनी म्हणजे महिला आहे. तमिळनाडू – राजीव गांधी – लिट्टे हा एक जुना त्रिकोण होता. त्याच्या चर्चांना आता पुन्हा उधाण येईल. हे ६ जण सुटल्यावर शांतपणे आपले उर्वरित आयुष्य घालवतील, अशी शक्यता जेवढी आहे, तेवढीच दुसरी शक्यता अशीही आहे की, हे येणार्या काळात तमिळ अस्मितेचे प्रतिनिधीत्व करतील किंवा त्यांना करायला भाग पाडले जाईल. येणार्या विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांना यांच्यापैकी कुणी उभे रहाण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही.
याचे बरेच अर्थ येणार्या काळात आपल्याला लावायचे आहेत. निकाल येऊन आता थोडाच काळ लोटला आहे. एवढ्यात काँग्रेसजनांच्या प्रतिक्रिया आल्या. काँग्रेसींनाही आता किती रडायचे हा प्रश्न आहे; कारण येणार्या निवडणुकांचाही संदर्भ त्यांना समोर ठेवला पाहिजे. ‘तमिळ अस्मिता या ६ जणांना हत्यारे मानते का ?’, हा त्यातील एक उपप्रश्न आहे. श्रीलंकेतील तमिळी यांना साहाय्य करण्याऐवजी ‘राजीव गांधी यांनी तेथे शांतीसेना पाठवली आणि भारतीय मनाची अशांतता वाढली’, असेच काहीसे तेव्हाचे चित्र होते. त्याचा सूड म्हणून राजीव गांधी यांची हत्या झाली. विदेश नीती विदेशापुरती नसते. ती देशांतर्गत कसा परिणाम करते, हे याचे उदाहरण होते. अजून तरी भारत हा पाकिस्तान अथवा बांगलादेश येथील हिंदूंना पुरेसे साहाय्य करत नाही. यावरून तितकासा रोष नाही. समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांना बांधलेले असतात. राजीव गांधी यांच्या हत्येमुळे अप्रिय आणि अमान्य असे एक पर्व भारताच्या राजकारणात चालू झाले. या सुटकेमधून पुढे काय होते, हे पाहूच !
२. दारासिंहच्या सुटकेचा मार्ग मोकळा ?
हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी स्टेन्स याच्या हत्येच्या प्रकरणी ओडिशामधील कारागृहात खितपत पडलेल्या दारासिंहच्या सुटकेचा मार्ग यातून किलकिला होईल की काय ? अशी आशा आहे. ‘कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर येणे’, हे ‘धर्मशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे ‘कर्मफलन्याया’ने हिशोब पूर्ण होणे असे नाही’, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये मात्र शिक्षा भोगून झाली की, आधीचा विषय संपूर्ण संपला, असे होते. या दोन्हींपैकी योग्य काय आहे, याचाही ऊहापोह कदाचित् या वेळी व्हायला हवा.
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (११.११.२०२२)