अमरावती येथील ‘भागवत महापुराण कथे’मध्ये हिंदूसंघटनाचा स्तुत्य प्रयत्न !
अमरावती, १० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक भारतीय सिंधू सभेचे युवा संघटक श्री. प्रकाश सिरवानी यांनी हिंदूसंघटनाच्या उद्देशाने शहरातील बडनेरा परिसरात सात दिवसांचे ‘श्रीमद़्भागवत महापुराण कथे’चे आयोजन केले. यात श्रीधाम वृंदावन येथील आचार्य श्री. अनिल मोहन महाराज यांनी मुख्य कथावाचन केले. या माध्यमातून बडनेरा परिसरातील हिंदूंनी एकत्रित व्हावे आणि त्यांना कथेसमवेत हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी विविध प्रकारची माहिती मिळावी, यासाठी श्री. सिरवानी यांनी प्रतिदिन विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदायाचे संत यांना काही वेळ विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले.
कथेच्या पाचव्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल सर्टिफिकेट : एक आर्थिक जिहाद’ याविषयी अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या वेळी आचार्य श्री. अनिल मोहन महाराज यांचा समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती उल्लेखनीय आणि आवश्यक विषयांवर कार्य करत आहे. हिंदूसंघटनासाठी अविरत कार्य करत असलेल्या समितीसह मी नेहमीच कार्य करत राहील. देशभरात मी कुठेेही असलो, तरीही हिंदु धर्मावरील आघातांविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन. समितीच्या कार्याला माझे आशीर्वाद आहेत.’’
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ३ दिवस प्रदर्शन लावण्यात आले होते. भाविकांनी याचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. बडनेरा येथील श्री. जय आहुजा यांनी तीनही दिवस ग्रंथप्रदर्शनावर सेवा करून उपस्थितांना साहित्याचे महत्त्व सांगून वितरणासाठी प्रयत्न केले.
२. उपस्थित महिलांनी कथा संपल्यानंतर लगेचच स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन केले.
३. एका धर्मप्रेमीने अमरावती येथील सुप्रसिद्ध कापड बाजारात प्रत्येक मासातून एकदा ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्याची मागणी केली.