हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य कौतुकास्पद ! – वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज
अमरावती, १० नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला माझे आशीर्वाद आहेत. माझे गुरु प.पू. योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्नेही होते. त्यामुळे पूर्वीपासून त्यांच्या कार्याविषयी मला माहिती आहे. सनातन संस्था आणि त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद़्गार वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज यांनी काढले. सिद्धयोग पूर्वाभ्यास साधना शिबिराच्या निमित्ताने शहरातील श्री क्षेत्र चांगापूर येथे प.पू. प्रकाश रावजी प्रभुणे महाराज आणि वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज यांचे आगमन झाले होते. शिबिराचे आयोजक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. राजेश व्यास, तसेच चांगापूर मंदिराचे मुख्य पुजारी श्री. श्यामसुंदर शर्मा यांनी हिंदु जनजागृती समितीला त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे निमंत्रण दिले. त्या वेळी समितीच्या वतीने महाराजांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे, सौ. अनुभूती टवलारे, सौ. कंचन शर्मा, श्री. स्वराज शर्मा उपस्थित होते.