आता प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
धाडसी निर्णयासाठी शिंदे-फडणवीस शासनाचे केले अभिनंदन !
मुंबई – गेली अनेक वर्षे न्यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही. या ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांची विविध आंदोलने झाली, शिवप्रेमींनी प्रसंगी लाठ्या खाल्ल्या, कारावास भोगला, तरी काँग्रेसी सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले; मात्र आज शिंदे-फडणवीस शासनाने शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला अफझलखानाच्या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास आरंभ केला. अफझलखानाचा वधाच्या, म्हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास घेतले, या निर्णयासाठी हिंदु जनजागृती समितीकडून सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन ! छत्रपती शिवरायांनी जसा जुलमी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून महापराक्रम केला, याच प्रकारे छत्रपती शिवरायांचा पराक्रम दाबण्याचा आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्या अनधिकृत बांधकामांचा शासनाने कोथळा बाहेर काढला आहे. आत याच ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे आणि हा पराक्रमाचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
Afzal Khan Tomb । अफजल खान कबरीवरील कारवाईचे अनेकांकडून स्वागत. पाहा काय म्हणतायत हिंदू जनजागृती समितीचे नेता सुनील घनवट … #Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #AfzalKhanTomb @SG_HJS pic.twitter.com/V3ahpLRIMz
— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) November 10, 2022
छत्रपती शिवरायांचे सर्व गडदुर्ग अतिक्रमणमुक्त करावेत !
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण होणे, हे मोगलांचे उदात्तीकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमानच आहे. आता शासनाने सर्वच गडदुर्गांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हटवावे, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समिती गेली काही वर्षे या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि जागृती करत आहे.
कोल्हापूर येथील विशाळगडावर १०० हून अधिक अनधिकृत पक्क्या स्वरूपाची बांधकामे झाली आहेत. तेथे रेहानबाबाच्या दर्ग्याचे भव्य स्वरूपात नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. याचप्रकारे पुण्यातील लोहगडावर अनधिकृत थडगे बांधून उरूस साजरा केला जातो. ठाण्यातील मलंगगडावर झालेले अतिक्रमण असो वा किल्ले कुलाबा येथे बांधलेली अनधिकृत मजार असो, ज्या छत्रपती शिवरायांनी राज्यातील जुलमी इस्लामी पातशाह्या संपवून हिंदवी स्वराज्य स्थापले, त्यांच्या गडांवर पुन्हा झालेली इस्लामी अतिक्रमणे ही छत्रपतींच्या पराक्रमाचा अपमान करणारीच आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षी असणार्या सर्वच गडांवर झालेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी आमची मागणी आहे.