‘चुकांमुळे साधनेची हानी होऊ नये’, यासाठी चुका स्वीकारण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जाणवलेले सकारात्मक पालट !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सर्व साधकांना भाववृद्धी सत्संगातून ‘भगवंताची भक्ती कशी करायला हवी ?’, हे शिकायला मिळत आहे. सर्व साधकांमध्ये भाव असूनही ते ‘त्यांच्यातील स्वभावदोषांमुळे होणार्या चुका आणि चुकांविषयी खंत नसणे’, यांमुळे ध्येयापासून भरकटत आहेत; म्हणूनच भगवंताने सर्व साधकांच्या साधनेची होणारी हानी भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून लक्षात आणून दिली आणि तितक्याच प्रेमाने खंत निर्माण होण्यासाठी दिशाही दिली. त्यानुसार साधकांनी स्वतःच्या चुकांचा अभ्यास करून केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
गुरुवार (३ नोव्हेंबर २०२२) या दिवशी आपण काही साधकांचे प्रयत्न पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624981.html
६. श्री. राहुल ढवण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
६ अ. चूक झाल्यावर लगेच स्वीकारता येणे आणि दोन देवदुतांचे साहाय्य घेतल्यामुळे मन सकारात्मक होणे : ‘भाववृद्धी सत्संगामध्ये सांगितले होते, ‘परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्या मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी ‘सकारात्मकता’ आणि ‘भावजागृती’ हे दोन देवदूत पाठवले आहेत.’ तेव्हापासून ‘माझ्या समवेत परात्पर गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. यापूर्वी माझ्याकडून एखादी चूक झाल्यावर ‘नकारात्मक विचार करणे, त्या विचारात अडकून रहाणे, चूक स्वीकारता न येणे आणि स्पष्टीकरण देणे’, असे व्हायचे. या आठवड्यात माझ्याकडून एक चूक झाली. तेव्हा मला ती चूक लगेच स्वीकारता आली. तेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार येण्यापूर्वी मला त्या दोन्ही देवदूतांचे अस्तित्व जाणवले. देवाने माझ्या मनात सकारात्मक विचार घातले आणि ‘श्रीकृष्ण माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे’, असे मला जाणवले.’
७. सौ. ज्योती राठी, कोपरगाव, महाराष्ट्र.
७ अ. चूक सांगितल्यामुळे शिकायला मिळणे आणि ती आनंदाची प्रक्रिया असल्याचे लक्षात येणे : ‘पूर्वी मी ‘माझ्या चुका दुसर्यांना कळू नये’, यासाठी प्रयत्न करायचे; पण मागील सत्संगात सांगितले, ‘दुसर्यांना चुका सांगितल्याने आनंद मिळतो.’ तेव्हा मी चूक सांगण्यास आरंभ केला. एकदा एक चूक माझ्या लक्षात आल्यावर माझे यजमान मला ओरडतील; म्हणून मी त्यांना चूक सांगितली नाही; पण सूनेला सांगितली. तेव्हा मला हलके वाटले. त्यानंतर एका प्रसंगात ‘एक चूक यजमानांना सांगू कि नको ?’, असे मला वाटत होते; पण त्यांना चूक सांगितल्यावर त्यांनी मला चांगले दृष्टीकोन दिले. तेव्हा ‘चूक सांगितल्यामुळे मला चुकीतून शिकायला मिळत आहे आणि ही आनंदाची प्रक्रिया आहे’, असे लक्षात येऊन माझा आत्मविश्वास वाढला.’
८. श्री. देवेन पाटील, देहली सेवाकेंद्र
८ अ. चूक झाल्यावर ती लपवणे आणि तेव्हा छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा उदास वाटणे : ‘माझ्याकडून एखादी चूक झाल्यावर माझ्यातील ‘अप्रामाणिकपणा आणि प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषांमुळे मी ती चूक न सांगता लपवायचो. तेव्हा मला छायाचित्रातील परात्पर गुरुदेवांचा तोंडवळा उदास वाटायचा आणि त्यामुळे मला आतून पुष्कळ वाईट वाटायचे.
८ आ. ‘चूक इतरांना सांगितल्यावर छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडवळ्यावरील हास्य वाढत आहे’, असे जाणवणे : एकदा मी ‘माझ्याकडून कोणती चूक झाली आणि मी ती कशा प्रकारे लपवली’, हे इतरांना सांगितले. त्यानंतर मी ध्यानमंदिरात गेलो. तेथील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला ‘त्यांच्या तोंडवळ्यावरील हास्य वाढत आहे’, असे जाणवले. तेव्हापासून माझ्याकडून चूक झाल्यावर मी ‘गुरुदेव माझ्याकडे बघत आहेत’, असा भाव ठेवतो. मला त्यांच्या तोंडवळ्याचे स्मरण होते आणि ते ‘मी काय करायला हवे ?’, हे ते मला सांगतात. यामुळे मला माझ्या साधनेत साहाय्य होत आहे.
८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा ‘त्यांना अपेक्षित असे प्रयत्न केले, तर त्यांना अधिक आनंद मिळेल’, असे वाटून स्वतःच्या साधनेच्या प्रयत्नांकडे लक्ष देणे : पूर्वी माझ्या मनात आपण ‘रामनाथी आश्रमात जाऊया आणि गुरुदेवांना भेटूया’, हा विचार पुष्कळ वेळा यायचा; पण आता ‘मी गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न केले, तर त्यांना अधिक आनंद मिळेल’, असे मला वाटते. त्यामुळे आता माझे माझ्या साधनेच्या प्रयत्नांकडेच अधिक लक्ष जाते.’
९. सौ. स्वाती मोदी, जोधपूर, राजस्थान.
९ अ. सत्संगामुळे खंत वाटण्याविषयीचे महत्त्व लक्षात आल्यावर अंतर्मुखता वाढून स्वतःच्या चुका लक्षात येणे : ‘मला पू. आई (सनातनच्या ६३ व्या संत पू. सुशीला मोदी) सतत सांगायच्या, ‘‘चूक झाल्यावर खंत वाटायला पाहिजे’’; पण ‘खंत वाटणे म्हणजे नेमके काय असते ?’, हेच मला कळले नव्हते. सत्संग ऐकल्यानंतर माझे खंत वाटण्याविषयीचे गांभीर्य वाढले. माझ्या मनात ‘खंत वाटण्याला किती महत्त्व आहे ? मला खंत वाटायला हवी’, हा विचार येत होता. त्यामुळे माझी अंतर्मुखता वाढली आहे. प्रत्येक प्रसंगात ‘मी कुठे न्यून पडले ?’, असा विचार व्हायला लागला आणि मला माझ्या चुका लक्षात येऊ लागल्या.
९ आ. चूक झाल्यावरही सकारात्मक राहिल्याने मनाला आनंद जाणवणे : ‘चूक झाल्यावर आपली सकारात्मकता कशी वाढेल ?’, याविषयीही सत्संगात सांगितले होते. त्याविषयी माझे निरीक्षण वाढायला लागले. एखादा प्रसंग माझ्या मनाविरुद्ध होत असला, तरीही ‘माझ्यावर देवाची कृपा आहे’, हे माझ्या लक्षात यायला लागले. त्यामुळे मला हलकेपणा वाटून माझे मन आनंदी झाले. अगोदर मला सहसाधकांविषयी प्रतिक्रिया येत होत्या; पण आता साधकांप्रती कृतज्ञता वाढली आहे. ‘त्यांच्यामुळे प्रसंग घडल्यावर मला माझे स्वभावदोष लक्षात येत आहेत आणि ते घालवण्यासाठी माझे प्रयत्न होत आहेत’, हे लक्षात आले. त्यामुळे माझा उत्साह वाढून मी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलनाच्या अंतर्गत सारणी लिखाण चालू केले आहे. आता माझ्या मनाला स्थिरता वाटत आहे.’
‘वरील सर्व प्रयत्नांतून लक्षात येते की, ‘जोपर्यंत आपण एखादा प्रयत्न करण्यास आरंभ करत नाही, तोपर्यंत आपल्या मनाचा संघर्ष होतो. त्या प्रयत्नांमुळे होणारे लाभ आपल्याला कळल्यावर आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि ते करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. त्यामुळे भगवंत आपल्याला प्रयत्न करण्यासाठी बळ देतो आणि त्याला अपेक्षित अशी कृती करवून घेतो. त्यातून होणार्या लाभामुळे आपल्याला ती कृती पुनःपुन्हा करावीशी वाटते. साखरेची गोडी चाखल्याविना तिची गोडी किती आहे, हे कळत नाही. त्याप्रमाणे आपल्या श्री गुरूंनी सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया केल्यावरच ‘त्या प्रक्रियेत त्रास आणि दुःख नसून आनंदच आहे’, हे आपल्याला कळू शकते. साधकांनी अंतर्मनापासून याची अनुभूती घेण्यास आरंभ केला आहे.
आपल्याला स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी खंत वाटली की, भगवंत आपल्याला क्षमा करतो आणि पुढे घेऊन जातो. आपल्याकडून चुका झाल्यामुळे आपण देवापासून १ पाऊल मागे गेलो, तरी त्या चुकांविषयी खंत आणि त्या सुधारण्याची तळमळ ठेवून प्रयत्न केल्यामुळे पुन्हा २ पावले देवाजवळ जाता येते’, हे साधकांच्या या प्रयत्नांतून शिकायला मिळते.’
संकलक : कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |