केवळ ४ वर्षे सेवा अन् साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.
हे लिखाण सद्गुरु डॉ. वसंत आठवले संत होण्यापूर्वीचे असल्याने या लेखातील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही ! – संपादक
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेत आणून सेवारत करणे
१ अ. ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय बंद केल्यावर ‘दिवस कसा घालवावा ?’ हे कळत नसल्याने मनाची स्थिती नकारात्मक होणे : ‘वर्ष २००४ मध्ये माझी ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर मी वैद्यकीय व्यवसाय (कन्सल्टिंग प्रॅक्टीस) बंद केला. व्यवसाय अचानक बंद केल्यानंतर ‘दिवस कसा घालवावा ?’, हे मला समजत नसल्यामुळे मला मानसिक अस्वस्थता आली आणि त्यामुळे माझ्या मनाची नकारात्मक भूमिका झाली होती. अशा स्थितीत ४ वर्षे गेली. त्या कालावधीत मला अधूनमधून प.पू. डॉक्टरांचा दूरभाष यायचा आणि ते मला प्रोत्साहन द्यायचे. त्या वेळी मला तात्पुरते चांगले वाटायचे; पण परत ये रे माझ्या मागल्या !
१ आ. साडेतीन मास रामनाथी आश्रमात रहायला असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे महान कार्य आणि त्यांची गुरु म्हणून असणारी महानता अनुभवता येणे : मार्च ते जून २००८ हे साडेतीन मास मी गोव्यातील रामनाथी आश्रमात रहायला होतो. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांच्या शेजारच्या खोलीत रहायला होतो. त्या वेळी बहुतेक वेळ मी झोपूनच असायचो. दोन्ही वेळेचा अल्पाहार आणि जेवण या वेळी माझी प.पू. डॉक्टरांसह निरनिराळ्या विषयांवर चर्चा व्हायची. त्यातून मला प.पू. डॉक्टरांचे महान कार्य आणि त्यांची गुरु म्हणून असलेली महानता अनुभवता आली, तसेच ‘ते मार्गदर्शन कसे करतात ?’, हेही दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ यांच्या माध्यमातून अनुभवता आले. तेव्हा आश्रमातील साधकांचे व्यक्तीमत्त्व आणि विचार यांमुळे माझ्या मनावर प्रभाव पडला. त्यामुळे सामान्य व्यक्तींना आदर्श साधक बनवणार्या प.पू. डॉक्टरांचा मोठेपणाही माझ्या लक्षात आला.
१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अतींद्रिय ज्ञानातील ‘ज्ञानयोग’ या विषयातील ज्ञानाच्या मथळ्यांचे विषयानुरूप वर्गीकरण करून त्यांची अनुक्रमणिका लावण्याची सेवा देणे : २ मास असेच गेल्यानंतर एके दिवशी प.पू. डॉक्टरांनी त्यांच्याकडे असलेल्या अतींद्रिय ज्ञानातील ‘ज्ञानयोग’ या विषयातील मथळ्यांचा कागदी गठ्ठा माझ्यासमोर ठेवला आणि मला त्या मथळ्यांचे वर्गीकरण करून त्यांची अनुक्रमणिका लावण्याची सेवा दिली. मला साहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. चारुदत्त पिंगळे यांना माझ्या समवेत दिले. (त्या वेळी ते संत झालेले नव्हते.) आम्ही ३ आठवड्यांत मथळ्यांची अंदाजे ३० प्रकरणांत विभागणी केली. त्या वेळी मला डॉ. पिंगळे यांच्याकडूनही पुष्कळ शिकायला मिळाले. मी साडेतीन मासांनी (महिन्यांनी) मुंबईला परतलो.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००९ पासून अनुक्रमणिका लावण्याची सेवा घरी पाठवण्यास आरंभ केल्यामुळे सेवा अविरतपणे चालू रहाणे : मी जानेवारी आणि फेब्रुवारी २००९ मध्ये जवळजवळ २ मास रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या बाजूच्या खोलीत रहात होतो. त्या वेळी त्यांनी मला निरनिराळ्या विषयांच्या मथळ्यांची अनुक्रमणिका लावण्याची सेवा दिली. मी २ मासांनंतर मुंबईला परतलो; पण या वेळी त्यांनी मला अनुक्रमणिका लावण्याची सेवा करण्यासाठी मुंबईला निरनिराळ्या विषयांचे मथळे पाठवण्यास आरंभ केला. त्यामुळे फेब्रुवारी २००९ पासून माझी सेवा अविरतपणे चालू राहिली. वर्ष २०११ पासून गुरुवर्यांनी मला निरनिराळ्या विषयांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचीही सेवा दिली. ती सेवा आजतागायत चालू आहे.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (आषाढ अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (६.८.२०१३))