असा अनुभवला आम्ही संतांच्या देहत्यागाचा आनंद सोहळा…!
सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या निधनानंतरचा आज (१०.११.२०२२) बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. त्या वेळी ‘संतांचा देहत्याग हा आनंद सोहळा असतो’, याची प्रचीती आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘याची देही, याची डोळां’ आली. या आनंद सोहळ्याचे वर्णन आणि त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
अ. ‘पू. बाबा शांतपणे झोपले आहेत. त्यांना हाक मारल्यावर ते उठतील आणि बोलतील’, असे वाटत होते.
आ. त्यांची त्वचा पिवळसर झाली होती.
इ. त्यांचा चेहरा पुष्कळ आनंदी आणि तेजस्वी वाटत होता.
ई. वातावरणात सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण होत होते. आनंदीआनंद जाणवत होता.
उ. श्वासोच्छ्वास चालू असल्याप्रमाणे त्यांच्या छातीची हालचाल जाणवत होती.
ऊ. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असल्याचे जाणवले.
ए. त्यांना कपडे घालतांना त्यांच्या मानेखाली हात धरून मी त्यांचे डोके उचलले. तेव्हा तेथे पुष्कळ गारवा जाणवला.
२. देहत्यागानंतर दुसर्या दिवशी पू. पद्माकर होनप यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असतांना जाणवलेली सूत्रे
३०.१०.२०२२ या दिवशी पू. बाबांनी देहत्याग केला. ३१.१०.२०२२ या दिवशी पू. बाबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. पू. बाबांचा देह आदल्या दिवसापेक्षा अधिक पिवळा आणि तेजस्वी झाल्याचे जाणवले.
आ. आदल्या दिवशी त्यांच्या देहात जाणवणारा जिवंतपणा वाढल्याचे जाणवले.
इ. ‘त्यांच्या आज्ञाचक्रातून आणि सहस्रारारातून पांढर्या रंगाच्या धुराच्या रूपातील चैतन्य सरळ रेषेत वर जात आहे’, असे उघड्या डोळ्यांनी दिसत होते.
ई. आरंभी त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद जाणवत होता. काही वेळानंतर त्यांच्या चेहर्यावर आर्तभाव दिसत होता. जणूकाही ‘भगवंता, मी तुझ्या चरणांशी आलो आहे’, असे पू. बाबा कळवळून म्हणत आहेत’, असे मला जाणवले.
– सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |