माहेश्वरी संघटनेच्या युवती शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान !
अमरावती, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटना आणि मणीरत्न रिसॉर्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ नोव्हेंबरला दोन दिवसांचे ‘तेजस्विनी २०२२’ हे शिबिर युवतींसाठी आयोजित केले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवली.
श्री. नीलेश टवलारे यांनी ‘धर्माचरण, उपासना आणि स्वसंरक्षण या तिन्ही प्रकारे हिंदु युवतींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे’, असे सांगितले.
युवतींनी उत्स्फूर्तपणे हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षकांकडून प्रात्याक्षिके समजून घेतली. अमरावतीसह अन्य जिल्ह्यांत एकूण ४ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली. ‘मणीरत्न रिसॉर्ट’चे मालक श्री. अशोक सोनी आणि शिबिराचे आयोजक श्री. अनिल राठी यांनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.