काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे बरळणे अज्ञानाच्या बळावर !
कर्नाटकाचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी काहीही कारण नसतांना स्वतःच्या अकलेचे तारे तोडले. ‘हिंदु हा शब्द पर्शियन आहे’, असा जावईशोध त्यांनी लावला. जगातील सर्वांत पहिली संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती आहे. अन्य संस्कृतींचा उदय त्यानंतर सहस्रावधी वर्षांनंतर झाला. संस्कृत भाषा ही जगातील सर्वांत पहिली भाषा आहे. संस्कृत वाङ्मयात आपल्याला अनेक ठिकाणी हिंदु शब्द आढळतो. ही गोष्ट सतीश जारकीहोळी यांना ठाऊक नाही. अज्ञानाच्या बळावर त्यांनी ‘हिंदु हा पर्शियन शब्द आहे’, असे विधान बेधडकपणे केले.
१. ‘मेरुतंत्र’ ग्रंथात करण्यात आलेली ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या
‘मेरुतंत्र’ नावाच्या ग्रंथात एक श्लोक आहे. त्या श्लोकात ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. त्यावरून हिंदु कुणाला म्हणतात, तेही स्पष्ट होते. तो श्लोक असा…
हिन्दुधर्मप्रलोप्तारो जायन्ते चक्रवर्तिन: ।
हीनञ्च दूषयत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये ।। – मेरुतंत्र
अर्थ : शंकर पार्वतीला सांगतात, ‘‘हे प्रिये, हिंदु धर्माचा नाश करण्याची प्रतिज्ञा करून ती पूर्ण करण्याकरता निरलसपणे उत्कट प्रयत्न करणारे मोठे चक्रवर्ती राजे पुढे होणार आहेत. अशा हीन वृत्तीची जो निंदा करतो त्याला हिंदु म्हणतात.
अशी ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या याच श्लोकात करण्यात आली आहे.
२. भारत देशाचे नाव हिंदुस्थान असण्यामागील कार्यकारण
‘सिंधु’ या शब्दावरून ‘हिंदु’ शब्द आला, असे सांगितले जाते, तेसुद्धा सत्य नाही. त्याचबरोबर आपल्या देशाला हिंदुस्थान हे नाव कसे पडले, ते ‘बार्हस्पत्य’ संहितेतील श्लोकातून कळते….
हिमालयं समारभ्य यावत् इन्दुसरोवरम् ।
तद्देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।
अर्थ : हिमालयापासून सिंधु सरोवरापर्यंत (हिंदमहासागरापर्यंत) पसरलेल्या देवनिर्मित देशाला ‘हिंदुस्थान’ असे नाव आहे.
याचा अर्थ हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत म्हणजे दक्षिण समुद्रापर्यंत पसरलेला जो भूभाग आहे, त्या भूभागाचे नाव हिंदुस्थान आहे. हिमालय या शब्दातील पहिले अक्षर ‘हि’ आणि इन्दू या शब्दातील दुसरे अक्षर ‘न्दु’ ही दोन अक्षरे एकत्र केली की, ‘हिंदु’ शब्द सिद्ध होतो.
३. तथ्यहीन विधान करणारे आमदार जारकीहोळी !
आता सांगा की, कर्नाटकचे आमदार सतीश जारकीहोळी सांगतात त्याप्रमाणे हिंदु शब्द पर्शियन भाषेतून आला आहे का ? त्याचबरोबर ‘या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला, तर आपल्याला लाज वाटेल’, असे तथ्यहीन विधान आमदार जारकीहोळी यांनी केले आहे.
४. ‘शब्दकल्पद्रुमकोश’ आणि ‘अद्भुतकोश’ या ग्रंथांमध्ये करण्यात आलेली हिंदु शब्दाची व्याख्या
४ अ. ‘माधव दिग्विजय’, ‘पारिजात हरण’, ‘शब्दकल्पद्रुमकोश’, ‘अद्भुतकोश’ इत्यादी अनेक ग्रंथांमध्ये हिंदु शब्दाच्या विविध व्याख्या आढळतात. ‘शब्दकल्पद्रुमकोश’ या ग्रंथात दिलेल्या हिंदूंच्या व्याख्येवरून ‘हिंदु किती उच्च प्रतीचे आहेत ?’, ते स्पष्टपणे दिसून येते. ती व्याख्या अशी…
हीनं दूषयति इति हिन्दु: ।
अर्थ : जे हीन (निंद्य आणि दूषणास्पद) असते, त्याला जो त्याज्य मानतो तो हिंदु.
४ आ. हिंदु आणि हिंदू हे दोन्ही शब्द पुल्लिंगी असून त्यांचा अर्थ : ‘दुष्टनाशक’ असा आहे, तसेच ‘राक्षसांचे शत्रू’ असाही अर्थ होतो. त्याचप्रमाणे ‘जे रूपशालिनी आहेत ते हिंदु’, असे हिंदूंचे वर्णन अद्भुतकोशात करण्यात आले आहे.
५. चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने हिंदु आणि हिंदु संस्कृती यांविषयी काढलेले कौतुकास्पद उद्गार !
चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने हिंदु आणि हिंदु संस्कृती यांविषयी काढलेले कौतुकास्पद उद्गार पुढीलप्रमाणे आहेत.
‘हिंदु आणि त्यांची संस्कृती ही मानवाच्या निराश आणि निरुत्साही आत्म्याला शीतल चंद्रिकेप्रमाणे सदैव आनंद आणि उत्साह यांचा झराच होऊन राहिली आहे.’
६. उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करायला हवे !
कर्नाटकच्या या काँग्रेस आमदारांनी असे ग्रंथ वाचून स्वतःची बुद्धी शुद्ध, पवित्र ठेवली असती, तर हिंदु धर्माला लाखोल्या वाहणारे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करावे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणार नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (८.११.२०२२)