नियोजन विभागाचे पूर्ण कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे होणार ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
पुणे – नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून पूर्णतः संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करायचे आहे. सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबवण्यात येणार्या कामावरील नियंत्रणासाठी ‘इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम’ (आयपास) या प्रणालीचा वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. ते ‘आयपास प्रणाली प्रशिक्षण’ कार्यशाळेत बोलत होते. १८ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये या प्रणालीचा वापर करणे अनिवार्य आहे; मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव आणि तांत्रिक अडचण यांमुळे प्रणालीचा वापर नियमित कामकाजात करणे शासकीय कार्यालयांना शक्य झाले नाही. मात्र यावर्षीपासून नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज हे या प्रणालीच्या माध्यमातून करायचे आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील कामकाज संगणकीकृत होऊन सर्व कारभार सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक होण्यासह प्रशासन गतीमान होण्यास साहाय्य होणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे #आयपास प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.सर्व यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या कामांवरील संनियंत्रणासाठी #आयपास प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे दिले निर्देश. pic.twitter.com/55INCoA5hs
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) November 4, 2022
ही प्रणाली वापरतांना अडचणी आल्यास जिल्हा नियोजन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांनी केले. या संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षण आणि सादरीकरण साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. अपर्णा गुरव यांनी केले.