पाकिस्तान म्हणजे भारतमातेच्या भूमीवर झालेले अतिक्रमण ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील व्याख्यान

दीपप्रज्वलन करताना भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – वर्ष १९४७ मध्ये आपल्याला केवळ स्वातंत्र्य मिळाले होते. भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचार यांनी खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ नंतर मिळाले आहे. गुलामीची जाणीव करून देणारे ३ सहस्र कायदे संपवून टाकले. त्यातून प्रत्येकाचे जीवन सुकर होत आहे. काश्मीरमधील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम कलम ३७० हटवून केले. पाकिस्तान म्हणजे भारतमातेच्या भूमीवर झालेले अतिक्रमण आहे. तेथील लोकांनीही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता; पण त्यांचा कुणीही विचार केला नाही. तो विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्याला भारताला पुन्हा विश्वगुरुपदी विराजमान करायचे आहे. यासाठी जाती-पाती उखडून समरसतापूर्ण व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. तसे केल्यासच आपण विश्वगुरु होणार आहोत, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी दिला. कलारंग संस्थेने २५ व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत चिंचवड येथे ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भविष्यातील भारत’ या विषयावर ते बोलत होते.

सुनील देवधर पुढे म्हणाले की,

१. मागील ६५ वर्षांत एका परिवाराचा मोठेपणा दाखवण्यासाठी इतर स्वातंत्र्यसेनानींकडे दुर्लक्ष झाले. विविध जाती, जनजाती यांच्यामधून शेकडो, सहस्रो क्रांतीकारक झाले. त्यांना आज पुन्हा समाजासमोर आणले जात आहे.

२. भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. सावरकरांनी ‘हिंदूंचे सैनिकीकरण आणि राजकीयीकरण झाले पाहिजे’, असे म्हटले होते. त्यामुळे हिंदूंनी मतदानाला जाताना हिंदु म्हणून विचार केला पाहिजे.

३. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या १० सहस्र धावांपेक्षा सावरकरांनी भितींवर लिहिलेल्या १० सहस्र ओव्यांचे अधिक कौतुक वाटले पाहिजे.

या वेळी व्यासपिठावर भाजपचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, तसेच माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे उपस्थित होते. कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक अमित गोरखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.