गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षच भाजपला हरवू शकतो ! – माजी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा
वंजारा यांनी स्थापन केला ‘प्रजा विजय पक्ष’ !
कर्णावती (गुजरात) – हिंदुत्वाविना कोणताही पक्ष गुजरातमध्ये भाजपची जागा घेऊ शकत नाही; कारण गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ पक्षच भाजपला हरवू शकतो, असे मत गुजरात पोलीस दलातील माजी आय.पी.एस्. अधिकारी डी.जी. वंजारा यांनी व्यक्त केले. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी डी.जी. वंजारा यांनी ‘प्रजा विजय पार्टी’ नावाचा स्वत:चा हिंदुत्वनिष्ठ पक्ष स्थापन केला आहे. वंजारा यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली, तसेच निवडणुकीत राज्यातील सर्व १८२ जागा लढवणार असल्याचेही घोषित केले.
ગુજરાતમાંથી ભય અને ભ્રષ્ટાચારના સામ્રાજ્યનો અંત કરી “નિર્ભય પ્રજારાજ” ની સ્થાપના કરવા માટે નવા રાજકીય વિકલ્પ તરીકે “પ્રજા વિજય પક્ષ”ની વિધિવત ઘોષણા આવતી કાલે તા. ૮-૧૧-૨૦૨૨ના રોજ, હોટેલ પ્લેનેટ લેન્ડમાર્ક, ઇસ્કોન ચાર રસ્તા નજીક, આમલી રોડ, અમદાવાદ મુકામે કરવામાં આવશે. જય વ વિજય હો.
— DG Vanzara (@VanzaraDg) November 7, 2022
आमचा पक्ष हा राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकत्र करेल !
वंजारा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, सत्ता ही एखाद्याला भ्रष्ट बनवते आणि बहुमतातील सत्ता पूर्णपणे भ्रष्ट बनवते. गुजरातमधील भाजपच्या २७ वर्षांच्या अखंडित कारभाराची सध्या अशीच स्थिती आहे. काँग्रेसने भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. ‘आप’देखील भाजपला सत्तेपासून दूर करू शकणार नाही. ‘प्रजा विजय पक्ष’ हाच एकमेव पक्ष आहे, जो हिंदुत्वाच्या सूत्रावर भाजपची जागा घेण्यासाठी सक्षम आहे. केवळ राजसत्तेला महत्त्व देणार्या भाजपपेक्षा हिंदुत्वाविषयी आमच्याकडे बरेच काही आहे. आमचा पक्ष हा राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकत्र करणारा अन् हिंदुत्व स्वीकारणारा आहे. लोकशाहीत एकाच पक्षाची सत्ता असू शकत नाही. लोकशाहीत मतांचे विभाजन झालेच पाहिजे. तो घटनात्मक योजनेचा भाग आहे. त्यात अयोग्य काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.