समाजाला योग्य दिशा देणारा कीर्तनकार घडवणारी पंढरपूर येथील ‘मुमुक्षु पाठशाळा’ !
अभ्यासू आणि अध्यात्माचा स्पर्श झालेला कीर्तनकारच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो. मनुष्याच्या जीवनाला अध्यात्माचा स्पर्श झाल्यास तो कठीण काळातही तरून जाऊ शकतो. सध्याच्या काळात अभ्यासू कीर्तनकार घडवण्याचे कार्य करणार्या पाठशाळा अत्यंत दुर्मिळ आहेत. कीर्तनकारांना प्रशिक्षण देणारी पंढरपूर येथील दुर्मिळ अशा ‘मुमुक्षु पाठशाळे’चे विद्यमान चालक ह.भ.प. गणेश महाराज पाटील यांचा परिचय झाला. त्यांच्याशी संवाद साधतांना त्यांनी मुमुक्षु पाठशाळेविषयी दिलेली माहिती येथे मांडत आहोत.
१. मुमुक्षु पाठशाळेची स्थापना ह.भ.प. श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांनी वर्ष १९६५ मध्ये पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे केली. सर्वप्रथम ह.भ.प. श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून कसलेही मूल्य न घेता पाठशाळेत शिकवण्यास प्रारंभ केला. ही परंपरा मागील ५७ वर्षे अविरत चालू आहे. पाठशाळेमध्ये १२ ते १३ वर्षांच्या पुढील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
२. या पाठशाळेत विष्णुसहस्रनाम, विचारसाधन, वृत्तीप्रभाकर, पंचदशी, न्याय सिद्धांत मुक्तावली, न्यायबोधिनी, ब्रह्मसूत्र भाष्य, अद्वैत सिद्धी यांसह ज्ञानेश्वरी, भागवत् आदी विषय शिकवले जातात. या अभ्यासासह विद्यार्थ्यांना टाळ-मृदुंग यांचेही प्रशिक्षण दिले जाते. एक परिपूर्ण कीर्तनकार होण्यासाठी ७ ते ८ वर्षे हे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. आतापर्यंत सहस्रो विद्यार्थी या पाठशाळेतून सिद्ध होऊन विविध क्षेत्रांत यशस्वी होत आहेत.
३. ह.भ.प. श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांनी ज्ञानोबा गाथा, नामदेव महाराज गाथा, एकनाथ महाराज गाथा सार्थ केल्या आहेत. मुमुक्षु पाठशाळेत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला कीर्तनकार हा पैशांचे मूल्य निश्चित न करता किंवा पैशांची अपेक्षा न करता निरपेक्षपणे कीर्तनसेवा करतो, हे या पाठशाळेचे वैशिष्ट्य आहे. या पाठशाळेत कीर्तनसेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याकडे, तसेच स्वत:च्या अध्ययनाकडे अधिक लक्ष दिले जाते.