आजारपणातही स्थिर राहून आंतरिक साधना करणारे इन्सुली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनचे साधक श्री. संजय नाणोसकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे) यांचे वडील जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) यांचे २९.१०.२०२२ या दिवशी इन्सुली (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी ४.०४ वाजता निधन झाले. ९.११.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.


सद्गुरु सत्यवान कदम

‘पूर्वी नाणोसकरकाका पूर्णवेळ साधना करत होते. नंतर वय झाल्यामुळे ते घरी राहून व्यष्टी साधना करू लागले. सनातनचे साधक घरी गेल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होत असे. घरातील सर्वांशी ते प्रेमाने वागत असत. त्यांच्या मुलांवर त्यांनी साधनेचे चांगले संस्कार केले. त्यांनी साधना करण्यासाठी मुलांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची मुले साधनारत आहेत.’ – सद्गुरु सत्यवान कदम

उपायांसाठी ठेवलेल्या दास मारुतीच्या चित्रातील चैतन्य आधुनिक वैद्यांनाही जाणवणे

‘एकदा कुडाळ येथील डॉ. रमेश परब तपासणीसाठी रुग्णालयात वडिलांच्या कक्षात आल्यावर त्यांच्या पलंगावरील उशीजवळ नेहमी ठेवलेले दास मारुतीचे चित्र त्यांना दिसले नाही. (ते चित्र प.पू. दास महाराज यांनी वडिलांना दिले होते.) तेव्हा डॉक्टरांनी ‘‘ते चित्र कुठे आहे ?’’, असे विचारले आणि उशीखाली असलेले चित्र शोधून त्यांनी स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये त्या चित्राचे छायाचित्र काढले. दुसर्‍या दिवशी मी डॉ. परब यांना दास मारुतीचे चित्र भेट म्हणून दिले. तेव्हा त्यांनी मला आलिंगन दिले. त्या वेळी आम्हा दोघांनाही भावाश्रू दाटून आले. तेव्हा ‘‘या चित्राचे महत्त्व विलक्षण आहे’’, असे भावोद्गार त्यांनी काढले.

नंतर २ दिवसांनी हे चित्र डॉक्टरांनी श्री. वेंगुर्लेकर (कै. नाणोसकर यांचे जावई) यांना दाखवले आणि ‘‘श्री. संदीप यांनी दिलेला मारुति आता माझ्या साथीला आहे’, असे तुमच्या मेव्हण्याला (श्री. संदीप नाणोसकर यांना) सांगा !’’, असे ते भावपूर्णतेने म्हणाले.’ – श्री. संदीप नाणोसकर (कै. नाणोसकर यांचा लहान मुलगा), इन्सुली

कै. जयदेव सोमा नाणोसकर

१. आजारपणाच्या कालावधीत जाणवलेली वैशिष्ट्ये

१ अ. देहबुद्धी विसरणे

१. ‘जयदेव नाणोसकर यांना, म्हणजे माझ्या वडिलांना अन्नपदार्थ भरवतांना ते आरंभी नकार देत असत. थोड्या वेळाने विचारल्यावर ते शांतपणे अन्नग्रहण करत.’ – श्री. संजय नाणोसकर (कै. जयदेव नाणोसकर यांचा मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ५४ वर्षे), सनातन आश्रम, देवद आणि सौ. शुभदा वेंगुर्लेकर (कै. नाणोसकर यांची कन्या), कुडाळ

२. ‘मल-मूत्र विसर्जनानंतर त्यांची स्वच्छता करतांना किंवा त्यांचे कपडे पालटतांना त्यांचे वागणे लहान बालकाप्रमाणे असायचे.’ – श्री. संदीप नाणोसकर (कै. नाणोसकर यांचा लहान मुलगा), इन्सुली

१ आ. कृतज्ञताभाव : ‘मी वडिलांची शुश्रूषा करायचो. तेव्हा ‘आश्रमातील सेवा सोडून मला त्यांच्या सेवेसाठी वेळ द्यावा लागत आहे’, याची त्यांना जाणीव व्हायची आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू यायचे.’ – श्री. संजय नाणोसकर

१ इ. परिस्थिती स्वीकारणे : ‘मेंदूच्या विकारामुळे वडिलांना डोकेदुखी, अंगदुखी, तोल जाणे, विचार शब्दांत व्यक्त करता न येणे आदी त्रास होत असत; परंतु वडिलांनी त्यांना होणारे त्रास तोंडवळ्यावर कधीही व्यक्त होऊ दिले नाहीत. या त्रासांमुळे त्यांनी कधी कोणावर रागवणे, चिडचिड करणे किंवा नाराजी व्यक्त करणे इत्यादीही केले नाही.’ – डॉ. संतोष नाणोसकर (कै. नाणोसकर यांचा मधला मुलगा), इन्सुली

१ ई. नामजप चालू असणे

‘मृत्यूपूर्वी २ दिवस आधी सासर्‍यांना घरी आणले होते. त्यांना अन्नपदार्थ भरवतांना ते ‘ॐ’ चा जप करायचे. तेव्हा ‘त्यांचा आतून नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. स्मिता संजय नाणोसकर (कै. नाणोसकर यांची सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२. जयदेव नाणोसकर यांच्यात जाणवलेले पालट

अ. ‘त्यांच्या पायाला मर्दन करतांना त्यांचे तळपाय गुळगुळीत वाटत होते. त्यांच्या हाताला स्पर्श करताच हात मऊसर वाटत होते. त्यांचा तोंडवळा मुलायम वाटत होता.’ – सौ. स्मिता संजय नाणोसकर

आ. ‘त्यांची त्वचा लहान मुलासारखी झाली होती आणि त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत होते.’ – सौ. शुभदा वेंगुर्लेकर

३. रुग्णालयात जाणवलेली सूत्रे

३ अ. वडिलांच्या कक्षात प्रवेश करताच ‘मंदिरात आल्यासारखे वाटते’, असे डॉक्टरांनी सांगणे : ‘वडिलांना कुडाळ येथील डॉ. रमेश परब यांच्या रुग्णालयात विशेष कक्षात (स्पेशल वॉर्डात) ठेवले होते. डॉ. परब तपासणीसाठी या कक्षात आल्यावर ‘मंदिरात आल्यासारखे वाटते’, असे सांगायचे.’ – श्री. संजय नाणोसकर

४. सासर्‍यांना रुग्णवाहिकेतून घरी आणल्यावर ‘रुग्णवाहिकेत सुगंध येत आहे’, असे तिच्या चालकाला जाणवणे

‘कुडाळ येथील रुग्णालयातून सासर्‍यांना रुग्णवाहिकेतून इन्सुली येथे घरी आणले. त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने ‘रुग्णवाहिकेत सुगंध येत आहे. रुग्णाच्या शरिराला काही लावले आहे का ?’, असे मला विचारले. प्रत्यक्षात तसे काहीही लावले नव्हते. समाजातील व्यक्तीला असे जाणवल्यामुळे माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर (कै. नाणोसकर यांचे जावई, वय ५८ वर्षे), कुडाळ

५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

५ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरांवरील उपायांमुळे वडिलांना होत असलेला तीव्र त्रास उणावणे : ‘२५.१०.२०२२ या दिवशी सूर्यग्रहण होते. त्या दिवशी रात्री वडिलांचा रक्तदाब पुष्कळ न्यून झाल्याचे पाहून डॉ. परब यांनी ‘रुग्णाची स्थिती नाजूक आहे. तुम्ही मनाची सिद्धता ठेवा’, असे सांगितले होते. याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना कळवल्यावर त्यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय चालू केले. रात्री मी सतत जप करत होतो. सकाळी ते शुद्धीवर आले आणि आमच्याशी बोलू लागले. हे पाहून डॉ. परब यांनी ‘‘गेल्या १५ ते २० वर्षांत प्रथमच मी अशी ‘केस’ पाहिली. केवळ ईश्वरावरील श्रद्धेच्या बळावर असा चमत्कार झाला’’, असे सांगितले. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

(त्या रात्री मी वडिलांच्या पलंगावर ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलत होतो. तेव्हा त्याने ‘पुढील ३ दिवस वडिलांना काही होणार नाही. २९.१०.२०२२ ला सकाळी ७ च्या दरम्यान त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्याच दिवशी दुपारी वडिलांचे निधन झाले.)

५ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे वडिलांना मृत्यूच्या वेळी होणारा तीव्र त्रास उणावणे : २९.१०.२०२२ या दिवशी म्हणजे वडिलांच्या निधनाच्या दिवशी सकाळी सद्गुरु राजेंद्रदादांनी दिलेला नामजप सलग ३ घंटे केल्यावर त्यांच्या अनाहत चक्रावर आलेला दाब पुष्कळ न्यून झाला. त्यानंतर वडील शुद्धीवर आले आणि त्यांना भेटायला आलेल्या नातेवाइकांशी काही शब्द बोलले. दुपारी ३.५० ला सद्गुरु राजेंद्रदादांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू करण्यास सांगितले. कुटुंबातील सर्वांनी नामजप चालू करताच थोड्याच वेळात त्यांचे निधन झाले. निधन झाल्याचे सद्गुरु दादांना कळवल्यावर त्यांनी ‘मला त्या वेळी वडिलांचे प्राण जाण्यात अडथळा येत असल्याची संवेदना जाणवली होती’, असे सांगितले.’ – श्री. संजय नाणोसकर

६. मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म करतांना आलेल्या अनुभूती

६ अ. प्राण जातांना तोंडवळा अतिशय शांत आणि स्थिर वाटणे : ‘आजोबांच्या निधनाच्या दिवशी दुपारी ४.०४ वाजता मी त्यांना चमच्याने पाणी देण्यासाठी गेलो. मी आजोबांना हाक मारताच त्यांनी डोळे उघडले. थोडेसे पाणी घेतल्यावर त्यांचा श्वास थांबला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुकृपेनेच मला त्यांच्या अंतिम क्षणी त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांचा प्राण जातांना त्यांचा तोंडवळा अतिशय शांत आणि स्थिर वाटत होता.’ – श्री. संदेश संजय नाणोसकर (नातू)

६ आ. ‘वडिलांच्या निधनानंतर ‘ते शांत निद्रा घेत आहेत’, असे सर्वांना जाणवले.

६ इ. वातावरणात कुठेही दाब वा ताण नसणे : अंत्यविधीची पूर्वसिद्धता करतांना, अंत्यविधीच्या वेळी, तसेच नंतर कुठेही ताण किंवा दुःख जाणवत नव्हते. सर्व सहजतेने आणि स्थिरतेने होत होते. नातेवाइकांनाही वातावरणात किंवा स्मशानभूमीत कुठेही दाब जाणवला नाही. – श्री. संजय नाणोसकर आणि श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर

७. ‘वडिलांची जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटका झाली असावी’, असे वाटणे

‘रुग्णाईत असतांना वडिलांचे वागणे-बोलणे, मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांच्यातील वाढलेले तेज आणि तीव्र वेदना असतांनाही त्यांचा चालू असलेला ‘ॐ’ चा जप, हे सर्व लक्षात घेता ‘वडिलांची जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटका झाली असावी’, असे मला तीव्रतेने वाटले.’ – श्री. संजय नाणोसकर

(सर्व सूत्रांचा दिनांक ३१.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक