ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने, तर पुणे येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला !
|
ठाणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – ठाणे, नाशिक आणि सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने, तर पुणे येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे’, असा राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड यांचा आरोप आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ७ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता चालू झालेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी बंद पाडला. (असे आमदार सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना बाहेर जाण्याचे आवाहन करत हुसकावून लावले. त्यामुळे वादाचे प्रसंगही घडले. ‘चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे परत करावेत’, अशी मागणी करणार्या एका प्रेक्षकावर आक्रमण करण्यात आले. या आंदोलनानंतर चित्रपटगृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित प्रेक्षकाने याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने छत्रपति शिवाजी महाराज पर बनी फिल्म ‘हर हर महादेव’ पर गलत इतिहास दिखाने का आरोप लगाया है.#NCP https://t.co/Pl4roy8CXn
— Zee News (@ZeeNews) November 8, 2022
मनसेकडून कारवाईची मागणी
या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा प्रयोग पुन्हा चालू केला, तर ‘प्रेक्षकांवर आक्रमण करणार्यांना अटक करा’, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर चित्रपटगृहाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसेने ८ नोव्हेंबर या दिवशी चित्रपटाचा संध्याकाळचा खेळ विनामूल्य ठेवला असून त्यात आक्रमण केलेल्या प्रेक्षकाला विशेष निमंत्रण दिले आहे.
हा प्रकार लांच्छनास्पद; आव्हाड यांनी क्षमा मागावी ! – अभिजित देशपांडे, लेखक आणि दिग्दर्शक
‘हा प्रकार लांच्छनास्पद आहे. जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागावी’, अशी प्रतिक्रिया ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या घटनेनंतर माध्यमांना दिली. देशपांडे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या प्रयोगाच्या वेळी चित्रपटगृहात घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड आक्रमण केल्याबद्दल ‘हर हर महादेव’ चित्रपटाची पूर्ण टीम या विकृत गुंडांचा निषेध करते. छत्रपतींवर राजकारण खेळणे बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा.’
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडूनही चित्रपटावर आरोप
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुणे येथे एक पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या वेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता, तसेच मराठी निर्माते अन् दिग्दर्शक यांना जाहीर चेतावणी दिली होती. या पत्रकार परिषदेनंतर आव्हाड यांनी स्वतःचे जातीयवादी राजकारण करण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला होता. मराठा क्रांती मोर्चानेही ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चित्रपटांद्वारे अवहेलना होत असल्याने कारवाई करण्यात यावी’, अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी (पुणे) येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याने गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी शहरामध्ये ‘विशाल टॉकीज’मध्ये चालू असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट बंद पाडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातील सर्व प्रेक्षकांना बाहेर काढले; मात्र विनापरवाना आंदोलन केल्याने संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शहराध्यक्ष सतीश काळेंसह कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
नाशिक आणि सोलापूर येथेही मराठा समाजाच्या काही संघटनांकडून या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले.
मान्यवरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या प्रतिक्रिया !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा दाबला जात आहे ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड यांनी ‘हर हर महादेव चित्रपटा’चे खेळ बंद पाडणे म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा दाबला जात आहे. ब्रिगेडी लोकांना न जुमानता या चित्रपटाचे खेळ व्हायला हवेत. प्रत्येकाला चित्रपटात अथवा नाटकात काय दाखवायचे आहे ? कसे दाखवायचे आहे ? हे पूर्ण ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. संभाजी ब्रिगेडने तिच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात विध्वंसक कृतींपलीकडे काही केले नाही. ब्रिगेडने गेल्या १५-२० वर्षांत खोटा इतिहास पसरवण्याचे काम केले आहे. अशा काही प्रकरणांमध्ये ते उघडे पडले आहेत आणि त्यावर न्यायालयीन दावे झाल्यावर त्यांनी क्षमाही मागितलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि सरकार यांनी चित्रपटगृहांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे अन् चित्रपटाचे खेळ व्हायलाच हवेत, असेच पहायला हवे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दादागिरीच्या प्रवृत्तीवर सरकारने नियंत्रण आणावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना ‘हर हर महादेव’, हा चित्रपट पहायला येणार्या दर्शकांना मारझोड करून नेमके काय साध्य करायचे आहे ? एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समर्थन करतो, असे सांगायचे आणि दुसरीकडे कायदा हातात घेऊन दर्शकांना मारहाण करून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणायची, हे कुठले वैचारिक स्वातंत्र्य ? यापूर्वीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. अनंत करमुसे यांना आमदार आव्हाड यांनी मंत्री असतांना बंगल्यात नेऊन मारहाण केली होती. त्यामुळे आव्हाड यांचे वर्तन लोकप्रतिनिधींना साजेसे आहे का ? त्यांच्या पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा, तर केवळ कुंकू लावायला सांगितल्यावर पू. संभाजीराव भिडे गुरुजींना नोटीस पाठवतात; मात्र स्वतःच्या नेत्यांच्या दादागिरीवर गप्प बसतात. त्यामुळे दादागिरीची जी प्रवृत्ती वाढत आहे, त्यावर सरकारनेच आता नियंत्रण आणावे.
चित्रपट पहाणार्या प्रेक्षकांना मारझोड करणे हे कोणत्या संस्कृतीला धरून आहे ? – अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणे हे कोणत्या संस्कृतीला धरून आहे ? तुम्ही नेहमी संस्कृतीच्या गोष्टी करता ना ? ही कुठली संस्कृती होती ? हा चित्रपट आम्ही इथे बसून पहाणार. चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारणे हे तुम्हाला कुणी शिकवले ?
चित्रपटाशी निगडित आवश्यक पुरावे सादर केल्यावरच आम्हाला प्रमाणपत्र देण्यात आले !
‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा खुलासा !
मुंबई – बाजीप्रभु देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लढायला गेले, या चित्रपटातील प्रसंगावर काहींनी आक्षेप घेतला आहे. त्याविषयी दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले, ‘‘हर हर महादेव’ चित्रपटाविषयी आम्ही लवकरच विस्तृतपणे स्पष्टीकरण देणार आहोत. आजवर आपल्याला जो इतिहास शिकवला गेला आहे, तो तेवढाच मर्यादित नाही. विविध बखरी आणि कागदपत्रे यांचा जेव्हा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या इतिहासकारांशी याविषयी चर्चा केली जाते, तेव्हा या सगळ्या अभ्यासातूनच हे संदर्भ आपल्याला सापडतात. या प्रसंगाविषयी आम्हाला परीनिरीक्षण मंडळाने शंका विचारली होती. त्यावर आम्ही योग्य पुरावेही सादर केले आहेत. केळूसकरांसारख्या मोठ्या इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा जसाच्या तसा उल्लेख आहे. केळूसकर यांना सत्यशोधक म्हणून ओळखले जायचे. अशा महान इतिहासकाराच्या संदर्भावरच आम्ही ते दृश्य चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटाशी निगडित जेवढे पुरावे आवश्यक होते, तेवढे सादर केल्यावरच आम्हाला यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले, असे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी सांगितले आहे.
सौजन्य टीव्ही ९ मराठी
संपादकीय भूमिकाज्या जितेंद्र आव्हाड यांनी आगामी ‘वेडात मराठे दौडले सात’ या चित्रपटात ‘उंच अभिनेते अक्षयकुमार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेशी जुळून येत नाहीत’, असे म्हटले, त्यांनी अक्षय कुमार यांच्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातील भूमिकेला का विरोध केला नाही ? त्यामुळे ‘हर हर महादेव’ला विरोध करणार्यांचा विरोध हा राजकीय दृष्टीकोनातून आहे आणि त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे लक्षात घ्या ! |