वायू प्रदूषणामुळे नैराश्यात जाण्याच्या आजारात होत आहे वाढ !
लोकांच्या स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम !
नवी देहली – ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. अभ्यासाद्वारे असे दिसून आले की, प्रदूषणामुळे मानसिक समस्या अधिक उद्भवू शकतात. प्रदूषणामुळे मानसिक आजार फार गंभीर होऊ शकतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांमध्ये नैराश्यामध्ये जाण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आत्महत्याही करतात. प्रदूषित ठिकाणी रहाणार्या लोकांना मानसिक विकार होण्याची शक्यता अधिक असते. हवेचे प्रदूषण स्मृतीभ्रंश यांसारख्या धोकादायक आजाराचे कारणही ठरू शकते.
१. वायू प्रदूषणामुळे मानसिक समस्यांनी ग्रस्त झालेल्या अनुमाने ३२ टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता आहे, तर १८ टक्के लोकांना प्रदूषित हवेतील ‘नायट्रोजन डायऑक्साइड’च्या संपर्कात आल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. हा अभ्यास वर्ष २०२१ मध्ये ब्रिस्टल विद्यापिठाच्या संशोधकांनी केला होता. या अभ्यासात १३ सहस्र लोकांचा समावेश करण्यात आला होता.
२. वर्ष २०१९ च्या जागतिक आढाव्यात असे समोर आले आहे की, वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
३. ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या अहवालानुसार, आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, वायू प्रदूषणामुळे लोकांची स्मरणशक्ती क्षीण होऊ शकते. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि वृद्ध यांच्यावर होतो. एवढेच नाही, तर प्रदूषणामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो. विषारी हवा आपली फुफ्फुसे आणि हृदय यांसाठीच नव्हे, तर मेंदूसाठीही धोकादायक ठरू शकते.
संपादकीय भूमिका१०० वर्षांपूर्वी प्रदूषण नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता; मात्र विज्ञानाद्वारे कथित विकास होत जात आहे, तसे प्रदूषण वाढत जात असून त्याचा पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्वप्रकारच्या संपदेवर विनाशकारी परिणाम होत आहे, हे सत्य कधी स्वीकारले जाणार ? |