सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात कारवाई करा !
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून याची मोठ्या प्रमाणात वाहतूकही जिल्ह्यातून होते. सध्याची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून यावर आळा घालणे महत्त्वाचे आहे. गांजा, चरस, कोकेन आदी अमली पदार्थांच्या छुप्या पद्धतीने होणार्या विक्रीच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समिल जळवी, सचिव शिरीष नाईक, सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले, तसेच या वेळी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीविषयी चर्चा केली. या वेळी उपरोक्त मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील (मुख्यत्वे केरळातील) काही व्यावसायिक शेती करण्याच्या नावाखाली भूमी भाडेतत्त्वावर घेऊन तेथे अमली पदार्थांची शेती करत आहेत. यामुळे जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा वाढला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी पोलीस प्रशासन याविषयी सतर्क असून अमली पदार्थांची तस्करी असो वा त्यांची वाहतूक असो, याच्या विरोधात कारवाई करेल, असे आश्वासन दिले.