गोवा : अमली पदार्थ व्यावसायिक एडविन न्युनीस याचे देशभरात ५० सहस्र ग्राहक
भाग्यनगर पोलीस न्युनीस याच्या संपत्तीचे अन्वेषण करणार
पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – हणजूण येथील कुप्रसिद्ध ‘कर्लिस’ उपाहारगृहाचा मालक एडविन न्युनीस याच्या अमली पदार्थ व्यवहारातून कमावलेल्या संपत्तीचे भाग्यनगर शहर पोलीस अन्वेषण करणार आहे. बनावट कोरोनाबाधित प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपावरून ४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी उशिरा जामिनावर सुटका झाल्यानंतर काही घंट्यांतच गोव्यात तळ ठोकलेल्या भाग्यनगर पोलिसांनी एडविन याला कह्यात घेतले. तेलंगाणा राज्यात एडविन याच्या विरोधात भाग्यनगर शहरातील रामगोपाल पेठ पोलीस ठाणे आणि अन्य दोन ठिकाणी गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. अन्य दोन गुन्ह्यांच्या प्रकरणी एडविन याला जामीन मिळालेला आहे. गोव्यात एडविन याच्या विरोधात एकूण २ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.
Edwin is allegedly involved in five criminal cases in Anjuna police station of Goa and three cases in Hyderabad, all related to supplying drugs. https://t.co/0JmdTg7lNS #Hyderabad #Goa #Drugs
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) November 5, 2022
एडविन याच्या कारनाम्याविषयी अधिक माहिती देतांना भाग्यनगर शहराचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद म्हणाले, ‘‘अमली पदार्थ व्यावसायिक एडविन याचे देशभरात ५० सहस्र ग्राहक होते आणि यामध्ये केवळ तेलंगाणा राज्यातील १ सहस्र २०० ग्राहकांचा समावेश आहे. एडविन दलालांच्या माध्यमातून सर्व तर्हेचे अमली पदार्थ ग्राहकांना पुरवत होता. एडविन याच्या मालकीची गोव्यात ३ महागडी घरे, ३ हॉटेल आणि अमली पदार्थ व्यवसायाचे मुख्य केंद्र असलेले हणजूण येथील ‘कर्लिस’ उपाहारगृह आहे. एडविन ‘कर्लिस’ येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध ‘डीजें’चा समावेश असलेल्या पार्ट्यांचे आयोजन करून या माध्यमातून अमली पदार्थ व्यवसायात वाढ करत होता. या पार्ट्यांमध्ये प्रवेशासाठी प्रत्येकी ३ ते ५ सहस्र रुपये आकारणे आणि स्वत: घाऊक पद्धतीने स्वस्त दरात घेतलेले अमली पदार्थ महागड्या किमतीने विक्री करत होता. अमली पदार्थ व्यवसायाला अनुसरून भाग्यनगर पोलीस लवकरच अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन्सीबी), गुप्तचर विभाग (द इंटेलिजन्स ब्युरो) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) यांची एक संयुक्त बैठक बोलावली जाणार आहे. या बैठकीत अमली पदार्थाची भारतात आयात करून त्याची ग्राहकांना पुरवठा करणारी साखळी यांवर चर्चा केली जाणार आहे.’’
संपादकीय भूमिकाभाग्यनगर पोलिसांनी अमली पदार्थ व्यवसायाविषयी माहिती मिळाल्यानंतर ३ मासांच्या आत एडविन न्युनीस याच्या विरोधात कारवाई केली, मग एवढी वर्षे ५० सहस्र ग्राहक असलेल्या एडविनच्या विरोधात गोवा पोलिसांनी कारवाई का केली नाही ? त्यामुळे ‘अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या साटेलोटे असल्याने न्युनीस यांच्यासारख्या गुन्हेगारावर कारवाई होत नाही’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही ! |