श्रीरामाप्रमाणे आदर्श आणि सर्वगुणसंपन्न सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये’ पाहिली. आज या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया.
(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)
या लेखचा मागील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/625739.html
६. श्रीरामाप्रमाणे आदर्श आणि सर्वगुणसंपन्न प.पू. डॉक्टर !
श्री. शिवाजी वटकर : अनेक साधकांना प.पू. डॉक्टरांमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन होते. याविषयी तुमचे काय म्हणणे आहे ?
ती. अप्पाकाका :
६ अ. आदर्श पुत्र : प.पू. डॉक्टरांनी ती. दादा (वडील, आताचे प.पू. (कै.) बाळाजी आठवले) आणि ती. ताई (आई, आताच्या पू. (कै.) श्रीमती नलिनी आठवले) यांना शेवटची १० – १५ वर्षे मुंबई येथे स्वतःच्या घरी ठेवून त्यांची स्वतः सेवा केली. काही काळाने सनातन संस्थेचे कार्य वाढल्यावर संस्थेच्या साधकांकडून ताई-दादांची सेवा करून घेतली.
६ आ. आदर्श बंधू : मी अन् माझा भाऊ अनंत (आताचे पू. अनंत बाळाजी आठवले) आणि त्याच्या पत्नी सौ. सुनीती (माझ्या वहिनी) गोव्याच्या रामनाथी आश्रमात रहात असतांना ‘आमची सर्व व्यवस्था नीट होत आहे कि नाही ?’, याकडे प.पू. डॉक्टरांचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारी आणि रात्री जेवतांना आम्ही एकत्र जेवायचो. त्या वेळी प्रत्येकाच्या आवडीनिवडीकडे त्यांचे लक्ष असायचे. माझे धाकटे बंधू (कै.) डॉ. सुहास आणि डॉ. विलास यांचीही त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेतली. प.पू. डॉक्टरांपेक्षा मी १० वर्षांनी आणि माझा धाकटा भाऊ अनंत (आताचे पू. अनंत बाळाजी आठवले) ७ वर्षांनी मोठा असूनही प.पू. डॉक्टरांनी आमची आमच्या मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेतली.
६ इ. आदर्श पिता : प.पू. डॉक्टरांना स्वतःला मूल नसले, तरी त्यांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘तुम्हाला पुष्कळ मुले होतील’, असा आशीर्वाद दिला आहे. आज सनातनच्या सर्व साधकांची ते स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेमाने काळजी घेत आहेत. प.पू. डॉक्टरांना लहान मुले पुष्कळ आवडतात.
६ ई. समाजासाठी आदर्श गुरु : समाजसेवा म्हणजे गरिबांना साहाय्य, वृद्धांची आणि रुग्णांची सेवा हे सर्व अन्य संत करतच असतात. हे पुण्यकर्मच आहे; परंतु समाजाला धर्माचरण आणि नामजप इत्यादी साधना करायला शिकवून त्यांना ऐहिक अन् पारलौकिक आयुष्यात अधिक सुख, तसेच समाधान देण्याचे महान कार्य प.पू. डॉक्टरच करतात. प.पू. डॉक्टरांविषयी सर्व साधकांना अनेक आध्यात्मिक अनुभूती आल्या आहेत. प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ची २ पाने या आध्यात्मिक अनुभूतींनीच भरलेली असतात. प.पू. डॉक्टर साधकांच्या घरच्या व्यक्तींची आपुलकीने चौकशी करतात. प.पू. डॉक्टर भू, भुवर्, स्वर्ग, महर्, जन आणि तपस् या लोकांपर्यंतच्या (उन्नत) जिवांना मार्गदर्शन करतात. प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळे अनेक साधकांना सूक्ष्म ज्ञान मिळत आहे.
६ उ. आदर्श शिष्य : प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ‘शिष्य’ या ग्रंथात ‘प.पू. डॉक्टरांनी शिष्यावस्थेत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांची कशी सेवा करून गुरुत्व प्राप्त करून घेतले’, याचे वर्णन आहे. ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.
६ ऊ. आदर्श राष्ट्रभक्त : त्रेतायुगात श्रीरामाने आदर्श राज्यकारभार केला. प.पू. डॉक्टर कलियुगात वर्ष २०२५ नंतर रामराज्याची स्थापना करणार आहेत. हिंदु राष्ट्र नव्हे, तर धर्मराज्य, म्हणजेच ईश्वरी राज्य स्थापन करण्याची कल्पना प.पू. डॉक्टरांचीच आहे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते साधकांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत.
६ ए. आदर्श जगद्गुरु : विश्वकल्याणासाठी अनेक ग्रंथ लिहून भूतलावरील, तसेच १४ लोकांतील (सप्तलोक आणि सप्तपाताळ येथील) जिवांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे प.पू. डॉक्टरच आहेत. विश्वशांतीचा शाश्वत मार्ग दाखवणारे प.पू. डॉक्टरच आहेत.
६ ऐ. आदर्श योद्धा : स्थुलातून लढणे, म्हणजे शरिराने लढणे सोपे आहे. प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून सातही पाताळांतील मोठ्या वाईट शक्तीसह सहजतेने लढू शकतात. मोठ्या वाईट शक्तींना त्यांची भीती वाटते. आपल्या प्रेरणेने आणि शिकवणुकीने ते साधकांत क्षात्रतेज निर्माण करतात.
६ ओ. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा सुरेख संगम असणे : सनातनच्या ग्रंथांद्वारे ब्रह्मज्ञानाचा प्रसार करणारे आणि वाईट शक्तींच्या विरुद्ध सूक्ष्मातून लढण्याची प्रेरणा देणारे प.पू. डॉक्टरच आहेत.
६ औ. प.पू. डॉक्टरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता
श्री. शिवाजी वटकर : आपल्याला आणखी अधिक काही सांगायचे आहे का ?
ती. अप्पाकाका : आश्रमातील आणि इतर साधकांचे गुण अन् त्यांची होणारी शीघ्र आध्यात्मिक प्रगती पाहून मला आनंद वाटला. ‘मी संसारात न अडकता अनेक वर्षांपूर्वीच माझ्या सर्व कुटुंबियांसह (पत्नी सौ. विजया वसंत आठवले, ज्येष्ठ मुलगी डॉ. (सौ.) श्रद्धा महेश गांधी (माहेरचे नाव कु. कला वसंत आठवले), मधली मुलगी डॉ. (सौ.) कविता प्रशांत देवस्थळी (माहेरचे नाव कु. कविता वसंत आठवले) आणि धाकटा मुलगा डॉ. कमलेश वसंत आठवले यांच्यासह) पूर्ण वेळ साधक होणे आवश्यक होते’, हे माझ्या लक्षात आले.
७. कृतज्ञता
माझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईने आणि परमभाग्यामुळे मला या जन्मी प.पू. डॉक्टरांसारखा भाऊ मिळाला, हे निश्चित ! पुष्कळ विलंबाने का होईना मला उपरती झाली, ती गुरुवर्य प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच !
८. प्रार्थना
‘प.पू. डॉक्टरांची अशीच कृपादृष्टी माझे सर्व कुटुंबीय आणि सर्व साधक यांच्यावर सदैव राहो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊन मोक्षाकडे वाटचाल होवो’, हीच परमेश्वराजवळ मनःपूर्वक प्रार्थना !’
– सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉक्टर यांचे सर्वांत ज्येष्ठ बंधू)
(समाप्त)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.