देहत्यागापूर्वी पू. पद्माकर होनप आणि श्री. राम होनप यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण !
‘२६.१०.२०२२ या दिवशी पहाटे ४ वाजता बाबांना शारीरिक त्रासांमुळे पुष्कळ वेदना होत होत्या; म्हणून त्यांनी मला हाक मारून झोपेतून जागे केले. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
बाबा : माझ्याकडून तुम्हाला काही अपेक्षित आहे का ?
श्री. राम होनप : नाही. आमच्याकडून तुम्हाला काही अपेक्षित आहे का ?
बाबा : नाही.
श्री. राम होनप : तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या !
बाबा : आशीर्वाद आहेच !
वरील संभाषण चालू असतांना बाबा माझ्याकडे पहात होते. तेव्हा त्यांची दृष्टी वेगळीच होती. संभाषण झाल्यावर बाबा शांत झोपले. वरील प्रसंगाविषयी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेणे’, हे पित्याचे कर्तव्य असते. त्यानुसार बाबांना त्यांच्या देहत्यागाची जाणीव झाल्याने त्यांनी मला वरील प्रश्न विचारून या विषयीची निश्चिती केली.’
– श्री. राम होनप (पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)
‘पू. पद्माकर होनप यांना त्यांच्या देहत्यागाच्या संदर्भात पूर्वकल्पना होती’, यासंदर्भात घडलेला एक प्रसंग !‘२४.१०.२०२२ या दिवशी रात्री १०.३० वाजता मला बाबांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी बोलतांना ते मला म्हणाले, ‘‘तू तात्काळ रेल्वेचे तिकीट काढून इकडे ये. नाहीतर उशीर होईल.’’ आरंभी त्यांचे हे बोलणे मला समजले नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, बाबांना त्यांच्या मृत्यूची कल्पना आली होती आणि त्यानुसार ते माझ्याशी बोलले.’ – श्री. सुरेंद्र होनप (पू. पद्माकर होनप यांचा मधला मुलगा), नाशिक (३.११.२०२२) |