देहत्यागापूर्वी पू. पद्माकर होनपकाका यांची जाणवलेली वैशिष्ट्ये
सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या निधनानंतरचा आज (८.११.२०२२) दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात पू. पद्माकर होनपकाका वास्तव्यास होते. त्यांना कर्करोग झाला होता. त्यांना चालता-फिरता येत नसल्याने ते झोपून असायचे. २८.१०.२०२२ या दिवशी मी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहे. ३०.१०.२०२२ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.
१. गुंगीत असूनही पू. होनपकाकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. गाडगीळ यांना ओळखणे
पू. होनपकाका यांना ५ मिनिटांच्या वर बसता येत नसल्याने त्यांना त्यांचा मुलगा श्री. राम आणि मुलगी कु. दीपाली यांनी पलंगावर आडवे केले. ते गुंगीतच होते. आम्ही त्यांना हाक मारल्यावर त्यांनी हळूच डोळे उघडले; पण त्यांना एका कुशीवर झोपवले असल्याने आणि त्यांच्यात मान वळवण्याचीही ताकद नसल्याने आम्ही त्यांना दिसलो नाही. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भूमीवर बसल्या. तेव्हा पू. होनपकाका यांना त्या दिसल्या. त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना, तसेच मी वाकून बघितल्यावर मलाही ओळखले आणि ते आमच्याकडे बघून हसले.
२. पू. होनपकाकांचा तोंडवळा चैतन्यमय आणि तेजस्वी दिसणे अन् त्यांच्याकडे पाहून ‘ते एवढे आजारी आहेत आणि त्यांना वेदना होत आहेत’, असे जाणवतही नसणे
कर्करोग शरिरात पसरल्याने पू. होनपकाकांना सातत्याने वेदना होत होत्या. त्यामुळे गेल्या १५ – २० दिवसांपासून त्यांना नीट झोपही लागत नव्हती. त्यांना अन्नही फारसे जात नव्हते. केवळ पातळ पदार्थ आणि तेही काही चमचे, एवढाच त्यांचा सध्याचा आहार होता. असे असूनही त्यांचा तोंडवळा चैतन्यमय आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्याकडे पाहून ‘ते एवढे आजारी आहेत आणि त्यांना वेदना होत आहेत’, असे जाणवतही नव्हते. चैतन्यामुळे ते गोरे दिसत होते.
२ अ. तोंडवळ्याप्रमाणेच त्यांच्या हातांवरही पिवळसर छटा आली होती, तसेच त्यांच्या हातांची त्वचा चमकतही होती.
३. मी पू. होनपकाकांच्या हाताला स्पर्श केल्यावर मला त्यांचे हात पुष्कळ मऊ लागले. यावरून तेजतत्त्वाप्रमाणे त्यांच्यातील वायुतत्त्वही वाढले असल्याचे जाणवले.
४. ‘प.पू. डॉ. आठवले आणि त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज माझ्या जवळच आहेत’, असे पू. होनपकाका यांनी सांगणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. होनपकाकांना विचारले, ‘‘तुम्ही कुणाचे स्मरण करता ? प.पू. डॉक्टरांचेका ?’’ तेव्हा पू. होनपकाका म्हणाले, ‘‘ते आणि (त्यांचे गुरु) प.पू. भक्तराज महाराज माझ्या जवळच आहेत !’’
५. पू. होनपकाकांना विचारले, ‘‘तुम्ही कोणता जप करत आहात ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘निर्विचार.’’
६. पू. होनपकाकांकडून अधिक प्रमाणात आनंद प्रक्षेपित होत असणे
पू. होनपकाका पुष्कळ आजारी असूनही त्यांच्याकडे पाहून आनंद जाणवत होता. ते लहान बाळाप्रमाणे निरागस दिसत होते. मी त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी सूक्ष्मातील स्पंदने शोधली, तेव्हा ती पुढीलप्रमाणे होती. त्यांतही आनंदाच्या स्पंदनांचे प्रमाण अधिक होते.
७. पू. होनपकाका यांचे सुपुत्र श्री. रामदादा यांनी सांगितले, ‘‘कालच पू. बाबा म्हणत होते, ‘आता मी परतीचा आनंद घेत आहे !’’
८. पू. होनपकाका यांचा प्राण नाक आणि वरचा ओठ यांच्या मध्यभागी आला असल्याचे जाणवले !
त्यामुळे ‘ते लवकरच देहत्याग करतील’, असे वाटले. त्यांचा मधला मुलगा श्री. सुरेंद्र उद्या यायचा होता. ‘त्याला दर्शन देण्याकरताच त्यांनी प्राण रोखून धरले आहेत’, असेही जाणवले. यावरून संत कसे इच्छामरणी असतात, हे शिकायला मिळाले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२२)
|