विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !
दीड लाख गावांत १ कोटी सदस्यांच्या नोंदणीचे उदिष्ट !
नागपूर – विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे. या हितचिंतक मोहिमेत गावोगावी धर्मांतर, लव्ह जिहाद, गोवंशरक्षण आदींविषयी जागृती केली जाणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातील गावांमध्ये विहिंप, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन २० रुपये नोंदणी शुल्क घेऊन हितचिंतक नोंदणी करणार आहेत. हे लोक हिंदु समाज आणि राष्ट्रहिताच्या कार्याशी जोडले जातील. विहिंप या मोहिमेद्वारे लोकांना धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांंच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणार आहे. १ कोटीहून अधिक सदस्य नोंदणीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.
मिलिंद परांडे म्हणाले की, या अभियानात प्रांतातील साधू-संत, मान्यवर नागरिक, लोकप्रतिनिधी, मठ-मंदिरांचे विश्वस्त आणि विविध जात-संप्रदाय यांचे प्रमुख यांना हितचिंतक (सदस्य) करण्यात येणार आहे. दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती यांद्वारे ५० सहस्र महिलांना सदस्य करण्याचेही ठरवण्यात आले आहे.