त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे त्रिपुरारी पौर्णिमेची १५५ वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा आजपासून चालू !
नाशिक – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची गेली १५५ वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू होत आहे. २ वर्षांनंतर यात्रा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असणार आहे. सद्यस्थितीत रथयात्रेची सिद्धता चालू असून ४० सहस्रांहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पेशव्यांचे सरदार विंचुरकर यांनी मंदिरास दिलेल्या ३१ फूट उंचीच्या भव्य आणि आकर्षक रथाला ३ बैलजोड्या जुंपल्या जाणार आहेत.
दिवाळीनंतर येणारा हा सर्वांत मोठा उत्सव त्र्यंबकेश्वर येथे दिवाळीप्रमाणेच साजरा होत असतो. त्रिपुरारी पौणिमेच्या दिवशी शहरात रथोत्सव आयोजित केला जातो. भगवान शिवशंकराने त्रिपुरासुरासमवेत ३ दिवस भीषण युद्ध करून त्रिपुरासुराचा वध केला. वध केला, तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून त्र्यंबकेश्वरला रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. ‘भगवान शंकराचा विजय व्हावा’, म्हणून ‘माता पार्वतीने कठोर आराधना करून या पौर्णिमेच्या दिवशी वाती प्रज्वलित करून जाळल्या’, अशी आख्यायिका आहे.
गेली २ वर्षे हा रथोत्सव झाला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणामुळे सिद्धता पहायला मिळत असून भाविकांची संख्या वाढणार आहे. या मार्गावर आरत्या केल्या जातात; पण यंदा आरती न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. ‘परंपरेनुसार तुंगार ट्रस्ट आणि देवस्थान यांचे ४ सदस्य यांच्या व्यतिरिक्त कुणीही रथावर चढणार नाही’, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.