पुणे येथे महिलेस पोलीस ठाण्यात बोलावून पुष्कळ मारहाण करणार्या पोलिसावर १५ दिवसांनंतर गुन्हा नोंद !
पुणे – रस्त्यामध्ये अडथळा होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याचा राग धरून पोलीस कर्मचारी राहुल शिंगे यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी एका ५० वर्षीय महिलेला पोलीस चौकीमध्ये बोलावून मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा डोळा सुजला असून तोंडवळा आणि डोके यांना पुष्कळ मार लागला होता. या महिलेने घटनेनंतर संबंधित पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला; परंतु तक्रार घेण्यास विश्रामबाग पोलिसांनी टाळाटाळ केली. हे प्रकरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यापर्यंत गेल्यानंतर १५ दिवसांनी शिंगे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची नोंद घेत संबंधित पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (अशा सूचना का द्याव्या लागतात ? खरेतर पोलिसांनी केलेल्या दिरंगाईसाठी त्यांच्यावरच गुन्हा नोंद करून कारवाई व्हायला हवी ! – संपादक)