नागपूर येथील अधिवेशनाच्या वेळी कर्मचार्यांनी नातेवाइकांकडे मुक्काम केल्यास निवासी जागा मिळणार नाही !
नागपूर, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून नागपूर येथे येणार्या कर्मचार्यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल. ‘नातेवाइकांकडे थांबल्यास सरकारी खोलीत जागा मिळणार नाही’, असे विधीमंडळ सचिवालयाने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
१. हिवाळी अधिवेशनासाठी मुंबई येथून येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची निवासव्यवस्था येथील ‘सिव्हिल लाईन्स’मधील १६० खोल्यांच्या इमारतींमध्ये केली जाते. प्रत्येक खोलीमध्ये ५ जणांची व्यवस्था असते. कर्मचार्यांनी मुंबई सोडण्यापूर्वीच नागपूर येथील खोली वाटपाचे नियोजन झालेले असते. त्यानुसार कर्मचार्यांना नागपूर येथे पोचल्यावर मिळालेल्या खोलीत मुक्काम करावा लागतो. बरीच मंडळी खोलीत जागा घेतात. त्यानंतर मात्र नातेवाइकांकडे मुक्कामासाठी जातात. परिणामी काही खोल्या रिकाम्या, तर काही खोल्यांमध्ये गर्दी असते.
२. योग्य नियोजनाच्या दृष्टीने आणि कामकाज प्रभावित होऊ नये, या दृष्टीने सरकारी निवासातच थांबण्याची सक्ती करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या अनुषंगाने खोल्या वाटपाचे नियोजन विधीमंडळ सचिवालयाने चालू केले आहे. ज्या कर्मचार्यांना नातेवाइकांच्या घरी मुक्कामी रहायचे असेल, त्यांनी निवासासाठी नावे देऊ नयेत. अन्यथा कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी विधीमंडळ सचिवालयाने परिपत्रकातून दिली आहे.
३. ‘हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांचे राहील’, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिले आहेत; मात्र ‘कार्यकाळ वाढवण्याची मागणी झाल्यास त्याचाही विचार केला जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २ वर्षे विदर्भात अधिवेशन झाले नाही. त्यामुळे ‘अधिवेशन ३ आठवड्यांचे करावे’, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जाण्याची शक्यता आहे.