असे चित्रपट काढाल, तर गाठ माझ्याशी ! – छत्रपती संभाजीराजे
चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड करणार्या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांना चेतावणी
पुणे – ‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे का ? ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाने, आपल्याला अधिकार दिले आहेत; म्हणून आपण चित्रपटात काहीही दाखवायचे का ? ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत ? चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना मी सांगू इच्छितो की, जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे, अशी परखड प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात दौडले वीर सात’ या २ चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके आपण वाचत नाही, ही आपलीही चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोडतोड करून आपल्या समोर मांडतात. माझी केंद्र आणि राज्य सरकार यांना विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी.
संपादकीय भूमिकाहिंदु सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो. हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन वैधमार्गाने रोखावे ! |