पाकिस्तानचे १०० आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत !
१. पाकिस्तानने १०० आतंकवादी काश्मीरमध्ये घुसवण्यासाठी केलेली पूर्वसिद्धता !
‘भारतात थंडी आणि बर्फवृष्टी वाढताच नापाक पाकिस्तानने कारस्थाने करण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ने लष्कर-ए-तोयबाच्या १०० आतंकवाद्यांना सिद्ध ठेवलेले आहे, अशी माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये काश्मीर सीमेजवळील परिसरात आतंकवाद्यांचे २०-२५ लाँच पॅड सिद्ध आहेत. तेथून त्यांना काश्मीरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न होईल. डिसेंबरमध्ये या भागात बर्फवृष्टी होईल. त्यामुळे सर्व खिंडी बंद पडतील. सद्य:स्थितीत पाकिस्तानचे २०० आतंकवादी काश्मीर खोर्यात आतंकवादी कृत्ये करण्यात गुंतलेले आहेत. त्यात बहुतांश स्थानिक असून काही अफगाणिस्तानी किंवा पाकिस्तानी आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आतंकवाद पसरला आहे. पाकिस्तानचे अर्धे सैन्य आतंकवाद्यांच्या विरुद्ध बलुचिस्तान, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविन्स आणि सिंध या भागांमध्ये गुंतलेले आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडून पाकिस्तानला साहाय्य मिळण्यापेक्षा त्रासच दिला जात आहे. ‘तेहरेके-तालिबान’चे आतंकवादी अफगाणिस्तानातून पाकिस्तानमध्ये येऊन आतंकवादी आक्रमणे करत आहेत.
२. पाकिस्तानने स्वतःची अर्थव्यवस्था चांगली न करता केवळ काश्मीर प्रश्नाकडेच लक्ष देणे
सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असून पाकिस्तानी जनता महागाईमुळे त्रस्त आहे. विरोधाभास असा आहे की, पाकिस्तानचे अर्थमंत्री आर्थिक साहाय्यासाठी ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’कडे गेले होते. तेव्हा त्यांनी आर्थिक साहाय्य मागण्याऐवजी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. काश्मीर सूत्र हे पाकिस्तानच्या जगण्यासाठी एवढे महत्त्वाचे आहे की, ते कुठेही गेले, तरी काश्मीरचे सूत्र मांडतातच. ‘काश्मीरचा राग आळवला, म्हणजे पाकिस्तानची जनता एकत्र होते’, असे त्यांना वाटते. इम्रान खान यांची निवडणूक प्रचारमोहीम आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात मोठ्या प्रमाणावर लढाई चालू आहे. याविषयीचे वृत्त आपण वृत्तवाहिन्यांमध्ये पहात असतो. असे सर्व कारस्थान चालू असतांना पाकिस्तान जनतेला एकत्र करण्यासाठी आणि तिचे लक्ष आर्थिक दुःस्थितीकडून काश्मीरमध्ये वळवण्यासाठी आतंकवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.
३. मोठे आतंकवादी आक्रमण करता येत नसल्याने पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून ‘सॉफ्ट टार्गेट’ना लक्ष्य करण्यात येणे
काश्मीरमध्ये प्रतिदिन ३-४ आतंकवादी ठार मारले जात असल्याने त्यांच्या ठिकाणी दुसरे आतंकवादी पाठवणे पाकिस्तानला आवश्यक वाटते. पाकिस्तानला वाटते की, काश्मीरमधील स्थानिक आतंकवादी पाहिजे तेवढे कडवे नाहीत. त्यामुळे तो त्यांच्याहून अधिक कडवे आतंकवादी पाठवून काश्मीर खोर्यात पुन्हा एकदा आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. गेले १-२ मास आपण पाहिले असेल, तर काश्मीरमधील पाकिस्तानी आतंकवाद्यांचे काश्मीरमध्ये कुठेही मोठे आतंकवादी कृत्य करण्याचे धाडस नाही. त्यामुळे ते काश्मिरी पंडित, सफरचंदाच्या बागांमध्ये काम करणारे कामगार किंवा अन्य कामासाठी बाहेरून आलेले लोक अशांना ‘सॉफ्ट टार्गेट’ (सहज मारता येतील असे) करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये आतंकवाद चालू ठेवायचा असेल, तर पाकिस्तानातून कडवे आतंकवादी पाठवणे पाकिस्तानला भाग आहे; पण भारताला काळजी करण्याची आवश्यकता नसावी. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेले भारतीय सैन्य अतिशय चांगले काम करते आणि ते ९५ टक्के आतंकवादी सीमेच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना मारून टाकते. त्यामुळे केवळ ५ टक्के आतंकवाद्यांनाच भारतात घुसता येते.
४. भारतीय सैन्याने आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी सतर्कतेसह आधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्य घेणे आवश्यक !
भारतीय सैन्याने सतर्कतेसह अधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आतंकवाद्यांना भारत-पाकिस्तान सीमेवरच मारता येईल. त्यामुळे काश्मीरमध्ये चालणारा हिंसाचार अल्प करण्यात भारताला यश मिळेल. यावर्षी काश्मीरमध्ये इतिहासात सर्वाधिक पर्यटक आले होते. हे लक्षात घेऊन पाकिस्तान तेथे हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करील. यामुळे काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय पटलावर पुन्हा एकदा पुढे येईल आणि काश्मीर हे आंतरराष्ट्रीय सूत्र बनवण्यात साहाय्य होईल. असे असले, तरी पाकिस्तानची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता पुष्कळ अल्प आहे. जे आतंकवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सीमेवरच ठोकले जाईल आणि जे थोडेफार आत येण्यास यशस्वी होतील, त्यांना ‘आतंकवादविरोधी अभियाना’च्या अंतर्गत काश्मीरमध्येच विविध ठिकाणी मारले जाईल.
जय हिंद !’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.