अधिकारी पदावर योग्य व्यक्तीच हवी !
सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे अटक करण्याच्या आदल्या दिवशी (३० ऑक्टोबर) त्यांना महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये काही मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. याही पुढे जाऊन लोहार यांनी अटक होण्याच्या दिवशी सकाळीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्यांसह भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रतिज्ञेतील शब्दाप्रमाणे आचरण करण्याची जाणीव असते; मात्र लोहार यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ किती मनापासून घेतली असेल, हे त्यांच्या कृतीतूनच समजते. एखाद्या अधिकार्याला पुरस्कार देतांना त्याच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला जातो का ? याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे, अन्यथा तो पुरस्कार आणि तो देणारे यांचा अपमान ठरेल. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी लोहार यांच्यावर ‘वादग्रस्त अधिकारी’ म्हणून शिक्का मारण्यात आला आहे.
डॉ. लोहार यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याविषयीचे पुष्कळ आरोप समोर येत आहेत. ‘शिक्षकांचे स्थानांतर हे ‘ऑनलाईन’पद्धतीनेच केले जावे’, या राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमाला हरताळ फासून डॉ. लोहार शिक्षकांचे ‘ऑफलाईन’ स्थानांतर करून पैसे कमवत होते. शिक्षकांच्या वैद्यकीय देयकासाठी ३ टक्के, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी दीड लाख रुपये, शाळा मान्यता आणि अनुदान वितरणासाठी ५ टक्के अशी रक्कम वसूल केली जात होती. ‘आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्ते डिसले गुरुजी यांना पुढील शिक्षणासाठी विदेशात जाण्यास प्रशासकीय अडथळे निर्माण करणारे हेच ते अधिकारी’, अशी चर्चाही झाली आहे. हे सर्व ऐकल्यानंतर विभागात अशी व्यक्ती असणे, हे शिक्षण विभागाला कलंकच आहे, असे कुणालाही वाटेल.
एका प्रयोगशील शिक्षकाच्या कामात अडथळा आणला जाणे, हे शिक्षण विभागासाठी लज्जास्पद आहेच, त्याहून असे भ्रष्ट अधिकारी शिक्षण विभागात असणे संतापजनक आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी हा सहस्रो शिक्षकांचे नेतृत्व करणारा महत्त्वाचा दुवा आहे. अशा महत्त्वाच्या पदावर भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणारी व्यक्ती अधिकारी म्हणून रहाणे घातक आहे. शिक्षण विभागात इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घेणारा अधिकारी त्या पदावर असायला हवा.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर