सलग दोन वर्षे त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
१. पहिल्या वर्षीची त्रिपुराररी पौर्णिमा !
१ अ. एका त्रिपुरारि पौर्णिमेला सेवेनिमित्त जात असतांना तेथे न जाता आपोआप दुसरीकडे जाणे आणि तिथून परत जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : ‘ एका त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमात ‘दीपोत्सव’ साजरा करण्यात येत होता. त्या दिवशी सायंकाळी मी सेवेनिमित्त मार्गिकेतून जिना चढत असतांना मला अकस्मात् आतून ‘मला कुणीतरी बोलावत आहे’, असे वाटले आणि माझे पाय विरुद्ध दिशेने वळले गेले. ‘मी असे का करत आहे आणि वेगळ्या ठिकाणी का जात आहे ?’, हे मला कळत नव्हते. ‘आतून मनाला शिवाची ओढ आहे’, असे तीव्रतेने जाणवत होते. त्या जागी गेल्यावर ‘मी इथे का आले ?’, याचे कारण मला कळले नाही. मी तिथून परत जायला निघाले, तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. ते त्यांच्या खोलीच्या खिडकीत उभे होते. त्या दिवशी त्रिपुरारि पौर्णिमेला मला ब्रह्मा, विष्णु आणि महेश स्वरूप असणार्या माझ्या गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मला दर्शन झाले. तेव्हा ‘मी त्या ठिकाणी आपोआप का ओढली गेले ?’, याचे कारण माझ्या लक्षात आले आणि मनात शब्दातीत कृतज्ञता व्यक्त झाली.
१ आ. ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असणारे त्रिदेव, म्हणजेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे स्वरूप असलेले मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे जाणवून अंतरात्म्याने त्यांना मनःपूर्वक सूक्ष्मातून साष्टांग नमस्कार करणे : त्या वेळी त्रिपुरारि पौर्णिमेचा खरा अर्थ माझ्या मनाला उमगला. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असणारे त्रिदेव, म्हणजेच आपले ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे स्वरूप असलेले मोक्षगुरु परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. त्यांनी केवळ मनुष्याला मोक्षाचा मार्ग दाखवला नाही, तर त्यांनी राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सर्वसामान्य जनतेला धर्माचरण शिकवून मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. तेव्हा ‘श्री गुरूंमध्येच ब्रह्मा-विष्णु-महेश या तिघांचे तत्त्व असते’, असे मला जाणवले. माझे हात जोडले जाऊन अंतरात्म्याचा गुरुमाऊलीला मनःपूर्वक साष्टांग नमस्कार झाला. गुरुमाऊलीचे दर्शन झाले, ते क्षण अजूनही वर्तमानात जगल्यासारखे सनातन (चिरंतन) आहेत.
१ इ. त्याच वेळी प.पू. दास महाराज यांची भेट होणे, त्यांनी ‘साक्षात् शिवानेच तुला दर्शन दिले’, असे सांगितल्यामुळे कृतज्ञताभाव दाटून येणे : त्रिपुरारि पौर्णिमेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यानंतर लगेचच मला अकस्मात् प.पू. दास महाराज भेटले. मी त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘आज त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी साक्षात् शिवानेच तुला स्वतः दर्शन दिले.’’ ते ऐकून माझ्या अंतःकरणात कृतज्ञता दाटून आली. माझ्याकडे कृतज्ञतेसाठी शब्दच नव्हते. ‘माझ्यासारख्या पामराला देवाने दर्शन द्यावे’, असे माझ्यात काही नसतांनाही देवाने कृपा केली, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. दुसर्या वर्षीची त्रिपुरारि पौर्णिमा !
२ अ. ‘या वर्षीच्या त्रिपुरारि पौर्णिमेलाही माझे दर्शन होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगणे : दुसर्या वर्षीच्या त्रिपुरारि पौर्णिमेला मला मागच्या वर्षीच्या प्रसंगाचे पुन्हा स्मरण झाले. तेव्हा मला असे वाटले, ‘या वेळी मला ते कसे दिसणार ? त्यांची इच्छा असेल, तर ते नक्की दर्शन देतील.’ तेव्हा मला माझ्या आतून परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आवाज ऐकू आला. ते मला म्हणाले, ‘‘त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी मी सगळ्यांना दर्शन देईन. ‘गेल्या वर्षीच्या त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी तुला दर्शन दिले, तसेच या वर्षीही दर्शन देईन.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला वाटले, ‘हे माझ्या मनाचे विचार असतील’ आणि मी ते विसरून गेले.
२ आ. पौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडे त्याच्या प्रीतीमय दृष्टीने पहात असतांना त्यांनी साधिकेकडेही पहाणे : या (दुसर्या) वर्षीच्या त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. तेव्हा मला त्यांच्या सूक्ष्मातील बोलण्याचे स्मरण झाले. गुरुमाऊली सगळ्यांकडे त्यांची करुणामय दृष्टी टाकत असतांना मी लांब उभी होते. तेव्हा त्यांनी लांबूनच माझ्याकडे त्यांचा कृपाकटाक्ष टाकला आणि माझे अंतःकरण अथांग प्रेमाने भरून आले. त्यांच्या दर्शनामुळे मी स्वतःचे अस्तित्व पूर्ण विसरून गेले आणि गुरुमाऊलीप्रती माझा शरणागतभाव जागृत झाला.
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |