अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामिक संस्थांकडून आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा !
भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह !
मुंबई, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांत हलाल प्रमाणपत्र देणार्या मुख्य संस्थांकडून आतंकवादी गटांशी संबंधित असलेल्या इस्लामिक संघटनांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करण्यात आल्याची वृत्ते त्या देशांतील काही अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. भारतामध्येही ‘जमियत-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनेकडून भारतातील विविध बाँबस्फोटातील ७०० हून अधिक आरोपींचे खटले लढवण्यासाठी अर्थसाहाय्य केले आहे. त्यामुळे भारतातही हलाल प्रमाणपत्राचा पैसा आतंकवादी कारवायांसाठी जात आहे का ? याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबईमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी आयोजित ‘हलाल शो इंडिया’ या परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे.
अमेरिकेत हलाल प्रमाणपत्र देणार्या ‘इस्लामिक फूड अँड न्यूट्रिशन कौन्सिल ऑफ अमेरिका’ या इस्लामिक संस्थेने ‘जमात-ए-इस्लामिया’, ‘हमास’ आणि ‘अल्-कायदा’ या संघटनांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील ‘मिडल ईस्ट फोरम’च्या पडताळणीमध्ये हा प्रकार उघड झाला आहे. अमेरिकेतील ‘दी डेली गार्डियन’ वर्तमानपत्रामध्ये २१ ऑगस्ट २०२१ या दिवशी हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ‘इस्लामिक कौन्सिल ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ (ICWA)चे अध्यक्ष डॉ. रतेब जेनीद यांनी वर्ष २०१३ च्या वार्षिक अहवालामध्ये हलाल प्रमाणपत्राचा निधी आतंकवादाचे समर्थन करणार्या कट्टरपंथियांना पुरवला जात असल्याचे म्हटले आहे. हे वृत्त ‘दी डेलीमेल’ या वर्तमानपत्रात ९ मे २०१४ या दिवशी प्रसारित झाले आहे.
‘इस्लामिक फूड अँड न्यूट्रिशन कौन्सिल ऑफ अमेरिका’ या संस्थेने वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीत फुरकान अकादमीला ३ लाख ६० सहस्र डॉलर्स दिले आहेत. फुरकान अकादमीच्या शेख उमर बलोच याने यू ट्यूबवर उघडपणे अमेरिकेतील ‘९/११’ चे आतंकवादी आक्रमण, न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च मशिदीवरील गोळीबार आणि श्रीलंकेतील ‘इस्टर’ च्या दिवशी झालेले बाँबस्फोटासाठी जिहादी आतंकवादी नव्हेत, तर ‘झायोनिस्ट’ (इस्रायल समर्थक) उत्तरदायी असल्याचा दावा केला आहे. ‘इस्लामिक फूड अँड न्यूट्रिशन कौन्सिल ऑफ अमेरिका’ वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत ‘गेनपीस’ या संस्थेला १ लाख १२ सहस्र डॉलर्स दिले. ‘गेनपीस’ ही ‘इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका’ (ICNA) ची धर्मांतराला प्रोत्साहन देणारी शाखा आहे. ‘गेनपीस’ ही ‘इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका’ही पाकिस्तानच्या ‘अल् खिदमत फाऊंडेशन’ ची सहयोगी संस्था आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार ‘अल् खिदमत फाऊंडेशन’ ही ‘हमास’ सारख्या इस्रायलच्या विरोधात लढणार्या आतंकवादी गटांना वित्तपुरवठा करते. ‘इस्लामिक फूड अँड न्यूट्रिशन कौन्सिल ऑफ अमेरिका’ या संस्थेने अशा प्रकारे अन्यही काही आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा केला आहे.
या सर्व उदाहरणांवरून या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा वेगवेगळ्या माध्यमांतून आतंकवादी कारवायांकडे जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतामध्ये ज्या पद्धतीने हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांकडून आतंकवादी कारवायांतील आरोपींच्या खटल्यांसाठी होणारा अर्थपुरवठा राष्ट्रविरोधी कारवायांची शक्यता निर्माण करत आहे. त्यामुळे मुंबई येथे होऊ घातलेल्या ‘हलाल शो इंडिया’ याला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
मुंबईतील ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रद्द करा, हलाल सक्तीविरोधी कृती समितीची मागणी
https://marathi.hindusthanpost.com/social/anti-halal-forced-action-committee-demands-to-cancel-international-halal-show-india-in-mumbai/101792/