संभाजीनगर येथे शस्त्रक्रियेनंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड !
संभाजीनगर – येथील इंटरनॅशनल रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. ही घटना ३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र यात रुग्णालयाच्या काचा, आसंदी आणि पटल फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. (अशा घटनांमधून समाजाचा संयम संपत चालला आहे, हे लक्षात येते. समाजाची नीतीमत्ता आणि संयम वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. – संपादक)
रुग्णाच्या नातेवाइकांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आमच्या २० वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याने आम्ही तिला ३ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता इंटरनॅशनल रुग्णालयात भरती केले होते. आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया केल्यावरही ती शुद्धीवर आली नाही. त्यामुळे बाजूच्या रुग्णालयात तिचे ‘सिटी स्कॅन’ करावे लागणार असल्याचे सांगत २ आधुनिक वैद्य समवेत आले; मात्र दुसर्या रुग्णालयात पोचताच दोन्ही आधुनिक वैद्य अक्षरशः पळून गेले. त्यामुळे त्याच परिस्थितीत कसेतरी आम्ही मुलीला रुग्णालयात भरती केले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराविषयी आणि आधुनिक वैद्य पळून गेल्याचे सांगण्यासाठी पुन्हा त्या रुग्णालयात गेल्यावर तिथे कोणतेही आधुनिक वैद्य उपलब्ध नव्हते. याविषयी संबंधित रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.